न्यूयॉर्क : भारताची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या (यूएनएचआरसी) 2026-28 या कार्यकाळासाठी निवड झाली असून, हा भारताचा सातवा कार्यकाळ असेल. मंगळवारी झालेल्या निवडणुकीच्या निकालांची घोषणा करताना एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, भारताचा 3 वर्षांचा कार्यकाळ 1 जानेवारी 2026 पासून सुरू होईल. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी पाठिंब्याबद्दल सर्व प्रतिनिधी मंडळांचे सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे आभार मानले.
संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश म्हणाले, ‘भारताची आज सातव्यांदा 2026-28 या कार्यकाळासाठी मानवाधिकार परिषदेवर निवड झाली आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘ही निवड मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्यांप्रति भारताच्या अतूट वचनबद्धतेचे प्रतीक आहे.’
भारत 2006 मध्ये परिषदेच्या स्थापनेपासून 2011, 2018 आणि 2025 ही वर्ष वगळता, सतत सदस्य राहिला आहे. 2006 मध्ये परिषदेच्या पहिल्या निवडणुकीत भारताला 190 पैकी 173 मते मिळाली होती आणि भारत सर्वाधिक मतांनी निवडून आला होता. तेव्हापासून भारत सहा वेळा - 2006-2007, 2008-2010, 2012-2014, 2015-2017, 2019-2021 आणि 2022-2024 या काळात सदस्य राहिला आहे.