BRICS summit | पहाटे चारपर्यंत मंथन अन्‌ कट्टर वैरी जाहीरनाम्यासाठी ‘रेडी’!  
राष्ट्रीय

BRICS Summit | पहाटे चारपर्यंत मंथन अन्‌ कट्टर वैरी जाहीरनाम्यासाठी ‘रेडी’!

भारताच्‍या मुत्‍सद्दीपणाचा ब्रिक्सच्या आदल्‍याच रात्री मोठा विजय

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्‍ली; वृत्तसंस्‍था : ब्रिक्‍स शिखर संमेलन सुरू होण्‍याला काही तास शिल्‍लक असतानाच भारताने प्रादेशिक व भू-राजकीय मुद्द्यांवर तीव्र मतभेद आणि वेगवेगळी भूमिका असणार्‍या सर्व देशांची ब्रिक्सच्या संयुक्त जाहीरनाम्यावर सर्वसंमती घडवून आणत मोठा मुत्सद्दी विजय मिळाला. शनिवारी पहाटे चार वाजेपर्यंत विविध मुद्द्यांवर मंथन घडवून आणत भारताने हे यश मिळविले, हे विशेष.

इराण, सौदी अरेबिया व यूएई या देशांत अनेक प्रादेशिक व भू-राजकीय मुद्द्यांवर तीव्र मतभेद आणि वेगवेगळ्या भूमिका आहेत. पश्चिम आशियातील संघर्ष आणि वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने भिन्न भूमिका असलेल्या या देशांशी ताळमेळ बसवण्यासह मतभेदांमुळे संयुक्त जाहीरनाम्यावर परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी सातत्याने चर्चा केली. त्‍याची परिणती गोड निर्णयात झाली.

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, चर्चेदरम्यान अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर मतभेद समोर आले. मात्र भारत भिन्न मते असलेल्या सदस्यांत सर्वसंमती घडवून आणण्यासाठी सातत्याने चर्चा करीत राहिला. भारताने सर्व सदस्यांना मान्य असेल, अशी सर्वसंमती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अखेर पहाटे चार वाजेपर्यंत विचारमंथनानंतर संयुक्त जाहीरनाम्यावर सहमती झाली.

ब्रिक्‍सचे सदस्‍य व सहयोगी सदस्‍य असलेल्‍या देशांचे महत्त्‍वाचे नेते १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी नवी दिल्लीत एकत्र आले असताना भारताने हे घवघवीत यश मिळविले. भारताला आपल्या अध्यक्षतेचा वापर या विविधतेने नटलेल्या गटातील सहकार्य मजबूत करण्यासाठी करायचा होता. भिन्न भू-राजकीय पार्श्वभूमी असलेले देश एकत्र येत असताना अशा व्यासपीठाला हाताळण्याचे आव्हान असते. या यशाने भारताने हे आव्‍हान लीलया पेलल्‍याचे अधोरेखित झाले. शिवाय ब्रिक्स प्रक्रियेला सामायिक हितसंबंध असलेल्या क्षेत्रांवर केंद्रित ठेवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमुळे वादग्रस्त मुद्द्यांवरील मतभेदांना संयुक्त जाहीरनाम्यात अडथळा ठरण्यापासून रोखण्यास मदत झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT