नवी दिल्ली; वृत्तसंस्था : रशिया आणि भारतातील व्यापारी संबंध द़ृढ होत असून, 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट आहे. केवळ व्यापारच नव्हे तर अणुऊर्जा निर्मिती क्षमता वाढविण्यासाठी रशियाची मदत घेतली जाईल, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली.
भारत आणि रशिया : एका नव्या द्विपक्षीय अजेंड्याकडे या परिषदेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जयशंकर यांनी हजेरी लावली. यात त्यांनी दोन्ही देशांच्या व्यापारी संबंधांवर भाष्य केले. जयशंकर म्हणाले की, भारत आणि रशियातील व्यापार 2030 पर्यंत 68.7 अब्ज डॉलर वरून 100 अब्ज डॉलरवर नेण्यात येईल. त्यासाठीचे शुल्क आणि नियामक अडथळे दूर केले जातील. सध्याच्या जागतिक राजकारणात, भारत-रशिया संबंधांनी गेल्या काही वर्षांत प्रादेशिक आणि जागतिक शांततेला चालना दिली आहे. भारत आणि रशिया यांच्यात विश्वास आणि परस्पर आदरावर आधारित एक विशेष सामरिक भागीदारी आहे. आजच्या बदलत्या भू-राजकीय परिस्थितीत, वारंवार होणार्या उच्चस्तरीय देवाणघेवाणीमुळे आमचा सहभाग अधिक दृढ होत आहे. डिसेंबर 2025 मध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दिलेल्या भारतभेटीमुळे आरोग्य, अन्नसुरक्षा, सागरी सहकार्य, खते, कुशल मनुष्यबळ, सीमाशुल्क आणि वाणिज्य, शैक्षणिक आणि माध्यम सहकार्य अशा विषयांचा व्यापार चर्चेत समावेश करण्यात आला असल्याचे जयशंकर यांनी सांगितले.
कझान व येकातेरिनबर्ग येथील नवीन वाणिज्य दूतावास आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक बंध अधिक दृढ करतील. यावर्षी भारत ब्रिक्सचे अध्यक्षपद भूषवत आहे. ब्रिक्सच्या अध्यक्षपदाच्या काळात मानवतेला प्रथम प्राधान्य देणारा आणि लोककेंद्रित द़ृष्टिकोन असेल. रशियासोबत मिळून सामायिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि त्यावर काम करण्यास उत्सूक असल्याची भावना जयशंकर यांनी व्यक्त केली.
अणुऊर्जेत घेणार रशियाचे सहकार्य..
नागरी अणुऊर्जेमध्ये रशिया आमचा अग्रगण्य भागीदार आहे. कुडनकुलम अणुप्रकल्प हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. भारताने 2047 पर्यंत अणुऊर्जा निर्मिती क्षमता 100 गिगावॅटपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अणुऊर्जेच्या शांततापूर्ण वापरासाठी रशियाच्या रूपाने भारताला विश्वासार्ह भागीदार मिळेल, असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला.