नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिका आणि भारतातील व्यापार तणाव वाढत असताना रशिया भारताचा व्यापारी मित्र होऊ पाहात आहे. द्विपक्षीय व्यापार येत्या पाच वर्षांत 100 अब्ज डॉलरवर नेण्याचे उद्दिष्ट दोन्ही देशांनी निश्चित केले आहे. परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांनी मॉस्को भेटीदरम्यान दोन्ही देशांनी व्यवसायातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले आहे.
उद्दिष्ट गाठण्यासाठी करदेखील कमी केले पाहिजेत. रशिया हा भारताचा चौथा मोठा व्यापारी भागीदार आहे. तर भारत हा रशियाचा दुसरा मोठा व्यापारी भागीदार असल्याचे जयशंकर म्हणाले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन या वर्षअखेरीस भारत भेटीवर येणार आहेत. त्यांच्या या भारतभेटीत उभय देशांमध्ये व्यापक स्वरूपाचे व्यापार आणि करार होण्याचे संकेत आहेत. अमेरिका आणि भारताचे व्यापारी संबंध ताणले गेल्यानंतर या घडामोडी होत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेलाची खरेदी सुरू ठेवल्याबद्दल भारतावर अतिरिक्त 25 टक्के शुल्क जाहीर केले आहे. त्यामुळे 27 ऑगस्टपासून अमेरिकेत जाणार्या निर्यातीवर भारताला 50 टक्के शुल्क मोजावे लागणार आहे. हे शुल्क लागू झाल्यास भारताच्या 85 अब्ज डॉलरच्या निर्यातीला फटका बसणार आहे. अमेरिकन निर्बंधामुळे भारतीय मालाला अडचणी आल्यास रशियाची बाजारपेठ खुली असेल, असे वक्तव्य बुधवारी रशियाच्या भारतीय दूतावासाने केले आहे.
मॉस्कोमध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की, रशियन तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार आम्ही नसून चीन आहे. याचबरोबर रशियन एलएनजीचे सर्वात मोठे खरेदीदारही आम्ही नसून ते युरोपियन युनियन आहे. 2022 नंतर रशियासोबत सर्वात जास्त व्यापार वाढवणारा देश आम्ही नसून ते दक्षिणेकडे काही देश आहेत.
भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे रशियन युद्धयंत्रणेला मदत होत असल्याचे आरोप अमेरिकेने केले आहेत. टीका करणार्यांमध्ये ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसेंट, व्हाईट हाऊसचे व्यापार सल्लागार पीटर नवारो आणि स्वतः राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा समावेश आहे. तथापि रशियाच्या राजधानीतून परराष्ट्रमंत्र्यांनी केलेले हे विधान ट्रम्प प्रशासनाच्या भारताविरुद्धच्या टीकेला विशेषतः रशियन तेल खरेदीमुळे लादलेल्या अतिरिक्त 25 टक्के टॅरिफला तीव्र शब्दांत प्रत्युत्तर आहे.
मॉस्को : रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या भारताच्या भूमिकेवर अमेरिकेने दबाव वाढवला असताना, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मॉस्कोमध्ये भारताची भूमिका अत्यंत ठामपणे मांडली आहे. भारताने केवळ रशियाकडूनच नव्हे, तर अमेरिकेकडूनही तेलाची आयात वाढवली असल्याचे सांगत त्यांनी निवडक टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताचे धोरण हे पूर्णपणे राष्ट्रीय हित आणि जागतिक ऊर्जा बाजारातील स्थिरता लक्षात घेऊन ठरवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येथे एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणारा सर्वात मोठा देश नाही आणि या व्यवहारात भारत एकटा नाही.