Indus Waters Treaty | ‘रक्त आणि पाणी कधीही एकत्र वाहू शकत नाही’; सिंधू जल करारावरील पाकच्या इशाऱ्यानंतर भारताकडून भूमिकेचा पुनरुच्चार 
राष्ट्रीय

Indus Waters Treaty | ‘रक्त आणि पाणी कधीही एकत्र वाहू शकत नाही’; सिंधू जल करारावरील पाकच्या इशाऱ्यानंतर भारताकडून भूमिकेचा पुनरुच्चार

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली / इस्लामाबाद; वृत्तसंस्‍था : सिंधू जल करारांतर्गत पाकिस्तानला मिळणारे पाणी अडवण्याचा प्रयत्न भारताने करू नये, असा इशारा पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री मोहम्मद इशाक दार यांनी दिला आहे. यावर भारत सरकारने अत्यंत कठोर शब्दांत प्रत्युत्तर दिले असून ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही’ या आपल्या जुन्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.

सरकारी उच्चपदस्थ सूत्रांनुसार, एका बाजूला भारतीय नागरिक व सुरक्षा दलांना लक्ष्य करायचे व दुसऱ्या बाजूला भारताकडून कराराचे तंतोतंत पालन व विनाअट डेटा शेअरिंगची अपेक्षा ठेवायची, हे धोरण आता चालणार नाही. यापूर्वी दार यांनी ब्रिटनमध्येही हाच मुद्दा उपस्थित करून भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.

इशाक दार यांचा दावा काय?

वॉशिंग्टन येथील एका परिसंवादात बोलताना इशाक दार यांनी असा दावा केला होता की, १९६० चा सिंधू जल करार पूर्णपणे वैध, कायदेशीर आणि बंधनकारक आहे. कोट्यवधी लोकांचे जीवन या नद्यांवर अवलंबून असल्याने पाणी प्रश्नाला राजकीय चढ-उतारांचा बळी ठरवू नये, अशी दोन्ही देशांची पूर्वीपासून भूमिका होती; मात्र आता त्याला तडे जात आहेत. याशिवाय दार यांनी हवामान बदलाचा दाखला देत पारदर्शक डेटा शेअरिंग, चर्चा आणि तांत्रिक सहकार्य वाढवण्याची मागणी केली. पाकिस्तानसाठी जल सुरक्षा ही अन्न, आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भारताची स्पष्ट भूमिका

पाकिस्तान सीमेपलीकडून दहशतवादाला खतपाणी घालत असताना सिंधू जल करारांतर्गत पूर्वीसारखे सहकार्य किंवा माहितीची देवाणघेवाण सुरू ठेवणे शक्य नाही, असे भारताने ठणकावून सांगितले आहे. दहशतवाद थांबल्याशिवाय पाण्याच्या वाटपावर एकतर्फी सहकार्याची अपेक्षा ठेवणे पाकिस्तानने बंद करावे, असा स्पष्ट संदेश या घडामोडीतून भारताने दिला आहे.

भारत पाण्याचा वापर शस्त्र म्हणून करू शकतो; पाकचे मंत्री इक्बाल यांचा दावा

इस्लामाबाद : आधुनिक इतिहासात पहिल्यांदाच पाण्याचा वापर एका हत्यारासारखा केला जात असून, भारत पाण्याचा वापर शस्त्र म्हणून करू शकतो, अशी भीती पाकिस्तानने व्यक्त केली आहे. पाकिस्तानचे वरिष्ठ नेते आणि मंत्री अहसान इक्बाल यांनी यासंदर्भात गंभीर चिंता व्यक्त करत म्हटले आहे की, भारताकडून पाकिस्तानविरोधात पाण्याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तानमधील पिकांना पाण्याची तीव्र गरज असेल तेव्हा भारत पाणी रोखून धरू शकतो, तर दुसरीकडे पाण्याची अजिबात गरज नसताना अचानक पाण्याचा विसर्ग करून पूरस्थिती निर्माण करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT