Indian Population Growth
नवी दिल्ली : भारताची लोकसंख्या 2025 अखेर 1.46 अब्जपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या नवीन अहवालात नमूद करण्यात आले आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताने आपली आघाडी कायम ठेवली असली तरी जनन दरातही महत्त्वपूर्ण घट झाली आहे.
संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (यूएनएफपीए) यांच्या ‘स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन 2025’ या अहवालानुसार, भारताचा एकूण जनन दर 1.9 प्रति महिला इतका घसरला असून, तो 2.1 च्या प्रतिस्थापन दराखाली आला आहे. याचा अर्थ असा की, एका पिढीनंतर लोकसंख्या नैसर्गिक स्वरूपात टिकवण्याइतकी प्रजनन क्षमता कमी होत आहे. दरम्यान, 65 वर्षांवरील वृद्धांची संख्या सात टक्के असून, येत्या दशकांमध्ये सुधारणा झालेल्या आयुर्मानामुळे या गटात वाढ होण्याची शक्यता आहे. 2025 साली पुरुषांचे सरासरी आयुर्मान 71 वर्षे तर महिलांचे 74 वर्षे राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
* जनन दर घसरला
* आर्थिक धोरणांपुढे नवे आव्हान
* वृद्धांच्या संख्येत वाढ
भारताचा युवा वर्ग अद्याप मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून 24 टक्के लोकसंख्या 0-14 वयोगटात, 17 टक्के 10-19 वयोगटात आणि 26 टक्के 10-24 वयोगटात असल्याचे अहवालात नमूद आहे. 68 टक्के लोकसंख्या कार्यक्षम वयोगटात (15-64 वर्षे) असून, योग्य रोजगार आणि धोरणात्मक समर्थन उपलब्ध झाल्यास भारताला मोठा लोकसंख्यात्मक लाभ मिळू शकतो.