नवी दिल्ली ः भारत आणि पाकिस्तान यांच्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही अनेकदा पुढाकार घेतला. मात्र, पाकिस्तानने आमचा प्रत्येक प्रयत्न शत्रुत्व आणि विश्वासघाताने संपवला, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. प्रसिद्ध अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रीडमन यांना पंतप्रधान मोदी यांनी सुमारे तीन तासांची मॅरेथॉन मुलाखत दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधी, भारत-चीन संबंध, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची त्यांच्या जीवनातील महत्त्वाची भूमिका, संयुक्त राष्ट्रसंघ यांसह विविध विषयांवर सविस्तर भाष्य केले.
मोदी म्हणाले, भारत-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानच्या नेतृत्वाने शहाणपणाने पावले उचलणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. मी 2014 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना आवर्जून आमंत्रित केले होते. त्यामुळे शांततेच्या प्रक्रियेला गती मिळेल, अशी माझी धारणा होती. मात्र, पाकिस्तानी राज्यकर्त्यांना शांती नव्हे, तर छुपे युद्ध हवे आहे, असे माझे निरीक्षण आहे. खरे सांगायचे तर पाकिस्तानातील दहशतवादाला तेथील जनता कंटाळली आहे. त्यांना शांतता हवी आहे. तरीही आम्हाला आशा आहे की, पाकिस्तानकडून शांततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
महात्मा गांधी हे केवळ विसाव्या शतकातील नव्हे, तर प्रत्येक शतकातील महान नेते आहेत. माझा भारत म्हणजे भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांची भूमी आहेे. या दोन्ही महापुरुषांनी जागतिक शांततेसाठी आपले आयुष्य वेचले. त्यामुळे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या आपली पार्श्वभूमी इतकी मजबूत आहे की, जेव्हा आपण शांततेबद्दल बोलतो, तेव्हा जग आपले ऐकते. आम्ही संघर्षाच्या बाजूने नाही. आम्हाला शांतता हवी आहे. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांशी माझे निकटचे संबंध आहेत. मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यासमोर बसून माध्यमांना सांगू शकतो की, ही युद्धाची वेळ नाही. मी झेलेन्स्कींना मैत्रीपूर्ण पद्धतीने सांगतो की, संपूर्ण जग तुमच्या पाठीशी कितीही उभे असले तरी वाटाघाटींद्वारेच संघर्षावर तोडगा निघू शकतो. मी नेहमीच शांततेच्या बाजूने आहे.
चीनसोबतच्या संबंधांबद्दल ते म्हणाले, भविष्यातही आमचे संबंध असेच मजबूत राहतील. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या माझ्या भेटीनंतर आम्हाला सीमेवर पुन्हा सामान्य स्थिती दिसून आली आहे. आम्ही संवादासाठी वचनबद्ध आहोत. वाटाघाटींच्या माध्यमातून किचकट समस्याही सुटतील, यावर आमचा विश्वास आहे. भारत आणि चीन यांच्यात संघर्ष नव्हे तर निकोप स्पर्धा असावी, असे माझे मत आहे. हे आशियाचे शतक आहे.
जागतिक व्यवस्थेचे नियमन करण्यात संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या अपयशावर मोदी यांनी टीका केली. ते म्हणाले, वैश्विक स्थैर्य राखण्यासाठी निर्माण केलेल्या संस्थांची जरब राहिलेली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्यांची उघडपणे पायमल्ली करणार्यांची भीड चेपल्याचे जागतिक पातळीवर दिसून येते. जग परस्परावलंबी असल्याचे मी वारंवार सांगितले आहे. कोणताही देश एकटा उभा राहू शकत नाही. पुढे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे शांततापूर्ण सहअस्तित्व, सहकार्य आणि विकास.