India Pakistan ceasefire |
नवी दिल्ली : शस्त्रसंधीचे उल्लंघन आम्ही करणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही पाकिस्तानने भारताला दिल्यानंतर दोन्ही देशांच्या लष्करी कारवाई महासंचालकांमध्ये (डीजीएमओ) युद्धविरामावर सहमती झाली होती. हा युद्धविराम आज संपणार का? दोन्ही देशांच्या लष्करी कारवाई महासंचालकांमध्ये (डीजीएमओ) पुन्हा बैठक कधी होणार? आणि ऑपरेश सिंदूर नंतर पुढे काय? यावर भारतीय लष्कराने आज स्पष्टीकरण दिले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम आज १८ मे रोजी संपत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिल्यानंतर लष्कराकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी कारवाई महासंचालकांमध्ये (डीजीएमओ) आज कोणतीही चर्चा नियोजित नाही. तसेच १२ मे रोजी झालेल्या डीजीएमओंच्या संवादात ठरल्याप्रमाणे युद्धविराम सुरू ठेवण्याची कोणतीही अंतिम तारीख नाही, असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन आम्ही करणार नाही, अशी ग्वाही पाकिस्तानने यापूर्वी १२ मे रोजी झालेल्या डीजीएमओच्या चर्चेप्रसंगी दिली होती. सोबतच, सीमेवरील सैन्य कपातीवर विचार करून त्याची कार्यवाही करण्यावर आणि दोन्ही बाजूंनी गोळीबार थांबवण्यावर या चर्चेत सहमती झाली होती.
१२ मे रोजी ही चर्चा दुपारी होणार असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले होते, मात्र नंतर त्या संध्याकाळी पार पडल्या. पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घाई यांना फोन केला, दोन्ही देशांनी गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एकमत झाले. लेफ्टनंट जनरल घई यांनी गेल्या रविवारी (दि. ११) पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तानने 'आम्ही शत्रुत्व थांबवू' असा प्रस्ताव मांडला. आम्ही युद्धबंदीचे उल्लंघन करणार नाही, अशी नरमाईची भूमिका पाकिस्तानने घेतली. त्यावर, युद्धबंदीच्या उल्लंघनाचा कोणताही प्रयत्न आम्ही खपवून घेणार नाही, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला ठणकावले.
भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू करून पाकिस्तान आणि पाक-अधिकृत काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला होता. हा हल्ला गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आला होता.