India Pakistan Conflict
सध्याच्या भारत- पाकिस्तान वाढत्या तणावादरम्यान भारताने मोठा निर्णय घेतला आहे. भविष्यातील कोणतेही दहशतवादी कृत्य युद्ध समजले जाईल. त्यानुसार त्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. याबाबतची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पाकिस्तानने शनिवारी पहाटे देशाच्या पश्चिम सीमेला लक्ष्य केले. त्यांनी भारताच्या लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी ड्रोन, लांब पल्ल्याची शस्त्रे, युद्धसामग्री आणि लढाऊ विमानांचा वापर केला. पण भारताने त्याला चोख प्रत्युत्तर देत त्याचे सर्व हल्ले यशस्वीरित्या परतवून लावले. दरम्यान, या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पश्चिम सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी, चौहान यांनी सिंह यांना सुरक्षेच्या परिस्थितीची माहिती दिली होती.
७ मे रोजी पहाटे भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर (एलओसी) ड्रोनचा वापर करुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जड-कॅलिबर आर्टिलरी बंदुकींनी गोळीबार केला. ज्यात काही नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांनी पंजाबमधील अनेक हवाई तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यांनी उधमपूर, पठाणकोट, आदमपूर आणि भूज येथील भारतीय हवाई तळांवर हल्ला केला. जम्मू आणि काश्मीरमधील तीन हवाई तळांवरील हॉस्पिटल आणि शाळांच्या इमारतींवर हल्ला केला.
जम्मू भागातील आरएस पुरा येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आठ बीएसएफ जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेबाबत खबरदारी म्हणून पंजाबमधील जालंधर आणि कपूरथला जिल्ह्यांमधील मॉल आणि व्यावसायिक आस्थापने बंद करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच पठाणकोटमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.