Operation Sindoor |
दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर'मुळे अस्वस्थ झालेल्या पाकिस्तानच्या भ्याड कृत्यांबाबत परराष्ट्र मंत्रालय, लष्कर आणि हवाई दलाने शनिवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत माहिती दिली. कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांच्यासह पाकिस्तानच्या नापाक कारवाया उघड केल्या.
वाढत्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी शुक्रवारी अडीच तास उच्चस्तरीय बैठक चालली. लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख या बैठकीस उपस्थित होते. त्यानंतर आज सकाळी परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले की, पाकिस्तान आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे. आज सकाळी पुन्हा एकदा पाकिस्तानने चिथावणीखोर आणि तणाव वाढवणाऱ्या कारवाया केल्या आहेत. आम्ही पूर्ण संयमाने त्याला योग्य प्रत्युत्तर देत आहोत. आज सकाळी पाकिस्तानने राजौरी शहरावर गोळीबार केला, ज्यात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राजकुमार थापा यांचा मृत्यू झाला, असे मिस्त्री यांनी सांगितले.
परराष्ट्र सचिव मिस्री यांनी पाकिस्तानच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी अफगाणिस्तानमध्ये भारतीय क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याच्या आरोपांना मूर्खपणाचे म्हणत फेटाळले. "अफगाण जनतेला कोणत्या देशाने त्यांच्यावर वारंवार हल्ले केले, याची आठवण करून देण्याची गरज नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, "पाकिस्तानकडून पश्चिम सीमेवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. पाकिस्तानकडून ड्रोन, लाँग रेंज शस्त्रास्त्र, फाईटर जेट्स आणि लोइटरिंग म्युनिशन्सचा वापर करून भारताच्या सैन्य तळांवर हल्ले केले गेले. उधमपूर, भुज, पठाणकोट आणि बठिंडा येथील हवाई तळांवर नुकसान केले. पंजाबमधील हवाई तळावर मध्यरात्री १.४० वाजता हाय-स्पीड क्षेपणास्त्रे डागण्यात आली, पण भारताने सर्व धोके वेळेत निष्प्रभ केल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय सशस्त्र दलांनी प्रत्युत्तर कारवाई करत पाकिस्तानचे कमांड अँड कंट्रोल सेंटर, रडार साइट्स आणि शस्त्रास्त्र साठ्यांना लक्ष्य केले. रफीकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कुर आणि चुनियान येथील पाकिस्तानी लष्करी ठिकाणांवर हल्ला केला. पसरूर येथील रडार साइट आणि सियालकोट येथील विमान तळावरही अचूक क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे कर्नल कुरेशी यांनी सांगितले.
पाकिस्तानकडून केवळ लष्करी तळांवर नव्हे, तर रुग्णालये आणि शाळांवरही हल्ले करण्यात आल्याचे कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले. "श्रीनगर, अवंतीपूर आणि उधमपूर येथील हवाई तळांवर पाकिस्तानने रुग्णालयांच्या इमारती व शाळांच्या परिसरांना लक्ष्य केले. ही एक अत्यंत निषेधार्ह कृती आहे, असे त्या म्हणाल्या."
विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले की, "भारतीय सशस्त्र दलांनी अचूक नियोजनासह केवळ निश्चित सैनिकी ठिकाणांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आहे. ही कारवाई जलद आणि नियोजित स्वरूपाची होती. पाकिस्तानकडून भारताच्या S-400 यंत्रणेचा नाश केल्याचा, तसेच सुरत आणि सिरसा येथील एअरफिल्ड उद्ध्वस्त केल्याचा खोटा प्रचार करण्यात येत आहे. भारत अशा बनावट आणि चुकीच्या दाव्यांना स्पष्टपणे फेटाळून लावतो."
भारताने दिलेल्या जबरदस्त तडाख्यानंतर पाकिस्तानात प्रचंड घबराट उडाली असून, पाकमध्ये बेबंदशाही निर्माण झाली आहे. लष्करप्रमुख असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांच्या जागी शमशाद मिर्झा यांची लष्कराच्या प्रमुखपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाकिस्तानने गुरुवारी रात्री लेहपासून सरक्रीकपर्यंत ३६ ठिकाणी केलेले ४०० वर ड्रोनचे हल्ले भारताच्या 'एअर डिफेन्स सिस्टीम'ने हाणून पाडले. अटारी बॉर्डर, जैसलमेर येथील सीमा सुरक्षा दलाच्या छावणीवरील ड्रोन हल्लेही फसले. त्यानंतर भारताने पाकला चोख उत्तर देत पाकच्या चार हवाई सुरक्षा तळांवर ड्रोनचा वज्राघात केला. त्यात पाकचा 'एअर डिफेन्स रडार' उद्ध्वस्त झाला. पाकिस्तानकडून तुर्कियेच्या ड्रोनचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा पाकने पुन्हा २६ ठिकाणी ड्रोन हल्ले केले. श्रीनगर विमानतळाजवळच एका ड्रोनचा स्फोट झाला. फिरोजपूरच्या नागरी वस्तीत एक ड्रोन कोसळले. तत्पूर्वी अवंतीपूर, श्रीनगर आणि बारामुल्लावर सहा ते आठ ड्रोन भारताने निष्प्रभ ठरवले.