नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, ८ मेच्या मध्यरात्री भारताने पाकिस्तानला दणका देत त्यांचे हल्ले परतवून लावले. त्यानंतर शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण सचिव, डीआरडीओ प्रमुख आणि लष्कर प्रमुख (सीडीएस) अनिल चौहान यांच्यासोबत एक बैठक घेतली.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतलेल्या या उच्चस्तरीय बैठकीत गुरूवारी रात्रभर झालेली कारवाई, देशातील सध्याची सुरक्षा परिस्थिती आणि इतर संभाव्य धोके, त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी यावर सविस्तर चर्चा झाली आणि सीमेवरील हालचाली आणि सैन्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच संरक्षण मंत्र्यांनी या बैठकीत देशात असलेल्या शस्त्रास्त्रांसह लष्करी उपकरणांची उपलब्धता आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या गतीचा आढावा घेण्यात आला. सीमेवर आणि सिमावर्ती भागात असलेल्या परिस्थितीवर संरक्षण रणनीतीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जाते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, भारत कोणत्याही सीमा आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यात अडथळा बनू देणार नाही आणि त्यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे. त्यापुर्वी बुधवारी रात्री उत्तर आणि पश्चिम भारतातील १५ ठिकाणी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानी लष्कराचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले उधळून लावले आणि लाहोरमध्ये पाकिस्तानी हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रीय केली होती.