राष्ट्रीय

Strait of Hormuz Tensions | 'होर्मुझ'मध्ये युद्धनौका तैनातीबाबत अमेरिकेशी कोणतीही चर्चा नाही; भारताची स्‍पष्‍टोक्‍ती

Strait of Hormuz Tensions अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी केले होते आवाहन

पुढारी वृत्तसेवा

Strait of Hormuz Tensions

नवी दिल्ली : होर्मुझच्या सामुद्रधुनीतून व्यापारी जहाजांची सुरक्षित ये-जा सुनिश्चित करण्यासाठी नौदलाच्या युद्धनौका तैनात करण्याबाबत अमेरिकेसोबत कोणतीही द्विपक्षीय चर्चा झालेली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने आज (दि. १६) स्पष्ट केले. विवादास्पद प्रदेशातील वाढता तणाव पाहता, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र देशांना या धोरणात्मक जलमार्गावर युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले होते. ट्रम्प यांच्या या विधानानंतर भारताने ही भूमिका स्पष्ट केली आहे.

ट्रम्‍प यांनी केले होते आवाहन

ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली होती. इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याच्या प्रयत्नांमुळे निर्माण झालेल्या "कृत्रिम अडथळ्यांचा" ज्या देशांना फटका बसत आहे, त्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्‍यांनी केले होते. यामध्ये त्यांनी चीन, फ्रान्स, जपान, दक्षिण कोरिया, युनायटेड किंगडम आणि इतर देशांनी हा जलमार्ग "सुरक्षित आणि खुला" ठेवण्यासाठी आपल्या युद्धनौका पाठवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, ट्रम्प यांनी उल्लेख केलेल्या कोणत्याही देशाने अद्याप यावर तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

या मुद्द्यावर अमेरिकेने भारताशी संपर्क साधला आहे का आणि भारताची यावर काय भूमिका आहे, या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, "या विषयावर भारताने वॉशिंग्टनसोबत (अमेरिका) कोणतीही द्विपक्षीय चर्चा केलेली नाही. अनेक देशांमध्ये या विषयावर चर्चा सुरू असल्याची आम्हाला कल्पना आहे. मात्र, आम्ही अद्याप द्विपक्षीय स्तरावर यावर चर्चा केलेली नाही." या संदर्भातील घडामोडींवर भारत लक्ष ठेवून असून इतर संबंधित घटकांशी चर्चा सुरू ठेवणार असल्याचेही जयस्वाल यांनी स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT