इस्लामाबाद / नवी दिल्ली : मुंबईवरील 26/11 च्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडे पाकिस्तानस्थित दहशतवादी म्होरक्यांना संपवण्याची एक सुवर्णसंधी होती. मात्र तत्कालीन राजकीय नेतृत्वाच्या निष्क्रियतेमुळे भारताने ही संधी गमावली, असा धक्कादायक खुलासा एका माजी वरिष्ठ गुप्तचर अधिकार्याने केला आहे. ‘संडे गार्डियन’ला दिलेल्या माहितीत या अधिकार्याने म्हटले आहे की, हल्ल्यानंतर पाकिस्तान लष्करी, आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या इतका कमकुवत झाला होता की, भारताने मर्यादित कारवाई केली असती तर तो मोठा संघर्ष टाळण्यासाठी लष्कर ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या शीर्ष नेत्यांचा ‘बळी’ देण्यासही तयार झाला असता. पण नवी दिल्लीतून क्लीअरन्स न मिळाल्यामुळे ही योजना फसली.
मुंबई हल्ल्यानंतर भारताच्या प्रतिक्रियेचे मूल्यांकन करणार्या टीमचा भाग असलेल्या या अधिकार्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही खळबळजनक माहिती दिली. त्यांच्या मते, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी कारवाईसाठी ‘ऑपरेशनल क्लीअरन्स’ दिला होता. मात्र अंतिम निर्णय राजकीय पातळीवर होऊ शकला नाही.
या अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार उच्चस्तरीय मानवी गुप्तचर माहितीच्या आधारे असे स्पष्ट झाले होते की, पाकिस्तान भारतासोबत पारंपरिक युद्धासाठी अजिबात तयार नव्हता. आम्ही आमच्या बाजूने कारवाईसाठी पूर्ण मंजुरी दिली होती. आवश्यक माहिती आणि पुरावे गोळा केले होते. आमच्या मूल्यांकनानुसार, पाकिस्तान लष्करी, आर्थिक किंवा साधनसामग्रीच्या दृष्टीने युद्धासाठी तयार नव्हता. उलट भारताकडून प्रत्युत्तरादाखल कारवाई होईल यासाठी ते मानसिकदृष्ट्या तयार होते आणि त्यांना युद्ध टाळायचे होते, असे या अधिकार्याने सांगितले. या अहवालानुसार सर्व भारतीय गुप्तचर यंत्रणांनी कारवाईसाठी हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, अंतिम निर्णय राजकीय नेतृत्वाला घ्यायचा होता. तो घेतला गेला नाही.
‘संडे गार्डियन’च्या वृत्तानुसार, मुंबई हल्ल्यानंतरच्या सुरुवातीच्या काही आठवड्यांत जैशचा म्होरक्या मसूद अझहर आणि लष्कर ए तोयबाच्या अनेक वरिष्ठ दहशतवाद्यांच्या ठिकाणांची अचूक माहिती भारताकडे होती. धक्कादायक बाब म्हणजे या दहशतवाद्यांच्या हालचाली (असामान्य मुव्हमेंट) मुद्दाम अशा प्रकारे केल्या जात होत्या, जेणेकरून भारताला संकेत मिळावा की, पाकिस्तान त्यांना ‘कुर्बान’ करण्यास तयार आहे. आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत, हे त्यांना (पाकिस्तानी यंत्रणांना) माहीत होते. त्यामुळेच त्यांनी काही दहशतवाद्यांना अशा ठिकाणी आणले होते, जेणेकरून आम्ही त्यांच्यावर कारवाई करावी. पण आम्ही ते पाऊल उचललेच नाही, असे या अधिकार्याने स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय दबावामुळे आपली काही ‘अॅसेटस्’ (दहशतवादी) गमावण्यासही पाकिस्तानी लष्कर तयार असल्याचे हे स्पष्ट संकेत होते. मात्र भारताकडून कोणतीही कारवाई न झाल्याने ही मोठी संधी हातातून निसटली.