राष्ट्रीय

India Lock down Rumours | लॉकडाऊन लागणार नाही; ममता बॅनर्जींच्या टीकेला अर्थमंत्र्यांचे उत्तर

पेट्रोल-डिझेल उत्पादन शुल्कात १० रुपयांची कपात; देशांतर्गत किंमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केला जाणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे. मात्र, केंद्र सरकारने या सर्व बातम्यांचे खंडन करत देशात लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पश्चिम आशियातील संघर्ष आणि जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पसरणाऱ्या या अफवांवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना कोरोना काळातील परिस्थितीचा संदर्भ दिला होता, ज्याचा चुकीचा अर्थ लावून सोशल मीडियावर लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्या गेल्या. त्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार लॉकडाऊन लावण्याची तयारी करीत असल्याचे वक्तव्य करून आगीत तेल ओतले. त्यामुळे देशभर लॉकडाऊनच्या अफवांना ऊत आला. म्हणून सरकारला याबाबत पुढे येऊन देशात लॉकडाऊन लावण्याची कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट करावे लागले.

पुरवठा वाढला; उद्योगांना प्राधान्य

व्यावसायिक एलपीजीचा पुरवठा आता ७० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. याचा फायदा प्रामुख्याने स्टील, ऑटोमोबाईल, टेक्स्टाईल आणि प्लास्टिक उद्योगांना होणार असून, मजुरांच्या हाताला काम मिळेल आणि पुरवठा साखळी विस्कळीत होणार नाही याची काळजी सरकार घेत आहे.

संसद आवारात माध्यमांशी बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जनतेला आश्वस्त करताना म्हटले की, 'देशात लॉकडाऊन लावण्याची कोणतीही योजना नाही. राजकीय हेतूने प्रेरित होऊन अशा अफवा पसरवणे चिंताजनक आहे. कोरोना काळासारखी परिस्थिती आता नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये.' पेट्रोलियममंत्री हरदीपसिंग पुरी यांनीही याला दुजोरा देत पुरवठा साखळी सुरक्षित असल्याचे सांगितले. वाढत्या महागाईच्या काळात केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर १० रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

'लॉकडाऊनच्या अफवा पसरवल्यास फौजदारी'

मुंबई : पुढारी वृत्तसेवा आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई आणि लॉकडाऊनच्या वावड्या उठत आहेत. मात्र, लॉकडाऊन लागणार नसल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे जे लोक अशा अफवा पसरवत असतील किंवा यासंदर्भातील खोटे मेसेज व्हॉट्सअ‍ॅप, सोशल मीडियावर फॉरवर्ड करतील त्यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिला आहे. देशात पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून अनावश्यक साठेबाजी किंवा पेट्रोल पंपावर गर्दी करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT