Ebola advisory India file photo
राष्ट्रीय

Ebola Advisory: भारताला इबोलाचा धोका! केंद्र सरकारकडून हेल्थ ॲडव्हायझरी जारी

इबोला विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमधून भारतात येणाऱ्या किंवा त्या देशांमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष आरोग्य सूचना जारी केली आहे.

मोहन कारंडे

Ebola advisory India

नवी दिल्ली : इबोला विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमधून भारतात येणाऱ्या किंवा त्या देशांमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष आरोग्य सूचना जारी केली आहे. लक्षणे आढळल्यास किंवा संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचा संशय असल्यास, इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी तातडीने विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरोग्य सेवा महासंचालनालयाने जारी केलेली ही नियमावली दिल्ली विमानतळासह देशातील प्रमुख विमानतळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने उच्च जोखमीचे देश म्हणून घोषित केलेल्या डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

'ही' लक्षणे ओळखा

दिल्ली विमानतळावरील एअरपोर्ट हेल्थ ऑर्गनायझेशनकडून ही सूचना प्रदर्शित करण्यात आली आहे. यात ताप, अशक्तपणा, डोकेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, उलट्या, जुलाब, घसा खवखवणे आणि कोणताही अनपेक्षित रक्तस्राव ही इबोलाची प्रमुख लक्षणे असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच, इबोला बाधित किंवा संशयित रुग्णाच्या रक्त अथवा शरीरातील द्रवांच्या थेट संपर्कात आलेल्या प्रवाशांनी तातडीने विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे. भारतात आल्यानंतर पुढील २१ दिवसांत कोणत्याही प्रवाशामध्ये इबोलासदृश लक्षणे दिसल्यास त्यांनी त्वरित वैद्यकीय उपचार घ्यावेत आणि आपल्या प्रवासाचा तपशील आरोग्य अधिकाऱ्यांना द्यावा.

देशात अद्याप एकही रुग्ण नाही; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेत देशातील तयारी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की, सध्या भारतात इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने इबोलाला आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून भारताने देशभरात उपाययोजना अधिक सक्रियपणे मजबूत केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT