भारताच्या भात्यात ‘मार्टलेट’ क्षेपणास्त्रे; यूकेशी 350 दशलक्ष पाऊंडचा संरक्षण करार 
राष्ट्रीय

India UK defence deal | भारताच्या भात्यात ‘मार्टलेट’ क्षेपणास्त्रे; यूकेशी 350 दशलक्ष पाऊंडचा संरक्षण करार

हवाई संरक्षण होणार अधिक मजबूत; नौदलासाठी इलेक्ट्रिक इंजिन निर्मितीवरही शिक्कामोर्तब, ‘आत्मनिर्भर भारत’ला बळ

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यात 350 दशलक्ष पाऊंड (सुमारे 468 दशलक्ष डॉलर्स) किमतीचा एक महत्त्वपूर्ण संरक्षण करार झाला आहे. या करारानुसार भारतीय लष्कराला यूके निर्मित अत्याधुनिक ‘मार्टलेट’ क्षेपणास्त्रे मिळणार आहेत. यामुळे देशाच्या हवाई संरक्षण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे, हा करार भारताची हवाई संरक्षण क्षमता अधिक मजबूत करेल. तसेच आत्मनिर्भर भारतच्या भावनेतून संरक्षण मंत्रालयाच्या सध्याच्या आणि भविष्यातील गरजा पूर्ण करेल. याशिवाय दोन्ही देशांमध्ये गुंतागुंतीच्या शस्त्रास्त्रांवर दीर्घकालीन सहकार्याला या करारामुळे पाठबळ मिळेल.

यूकेच्या संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, या क्षेपणास्त्र पुरवठ्यामुळे उत्तर आयर्लंडमध्ये (यूकेच्या चार घटक राष्ट्रांपैकी एक) थेट 700 हून अधिक नोकर्‍या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टार्मर यांच्या पहिल्या अधिकृत भारत दौर्‍याच्या दुसर्‍या आणि शेवटच्या दिवशी ही घोषणा करण्यात आली. स्टार्मर यांच्यासोबत 125 उद्योगपतींचे शिष्टमंडळ असून, त्यांनी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यूकेच्या संरक्षण मंत्रालयानुसार या करारामुळे बेलफास्टमध्ये तयार होणारी ‘लाइटवेट मल्टीरोल मिसाईल’ भारतीय लष्कराला दिली जातील. हा यूकेच्या संरक्षण उद्योगासाठी एक मोठा ‘बूस्ट’ आहे.

काय आहेत ‘लाईटवेट मल्टीरोल मिसाईल’ (LMM)

‘मार्टलेट’ या नावानेही ओळखली जाणारी ही क्षेपणास्त्रे बेलफास्ट येथील संरक्षण कंत्राटदार ‘थेल्स एअर डिफेन्स’ने विकसित केली आहेत. ही वजनाने हलकी असून विविध भूमिका पार पाडण्यास सक्षम आहेत.

ही क्षेपणास्त्रे हवेतून जमिनीवर, हवेतून हवेत, जमिनीवरून हवेत आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकतात.

या क्षेपणास्त्रांचे नाव ‘मार्टलेट’ या पौराणिक पक्ष्याच्या नावावरून ठेवले आहे, जो कधीही घरटे करत नाही, असे मानले जाते. हे नाव इंग्लिश कुलचिन्हशास्त्रामधून (हशीरश्रवीू) घेण्यात आले आहे.

या क्षेपणास्त्रांचा वापर सामान्यतः हवाई संरक्षणासाठी केला जातो आणि ती ड्रोन व चिलखती वाहनांसह विविध प्रकारच्या लष्करी लक्ष्यांना भेदण्यास सक्षम आहेत. मार्चमध्ये झालेल्या एका करारानुसार, यूके हीच क्षेपणास्त्रे युक्रेनलाही पुरवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT