नवी दिल्ली : जगातील सर्व प्रमुख व्यापारी राष्ट्रांसोबत भारत व्यापार वाटाघाटी करत असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शुक्रवारी दिली. भारताने ऑस्ट्रेलिया, यूएई, मॉरिशस, युनायटेड किंग्डम आणि चार राष्ट्रांच्या ईएफटीए गटासोबत संतुलित आणि समान व्यापार करार केले आहेत. सध्या अमेरिका, युरोपियन युनियन, जीसीसी देश, न्यूझीलंड, इस्रायल, युरेशिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि मर्कोसुर गटासह सुमारे 50 राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणार्या 14 देशांशी किंवा गटांशी व्यापार चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले. पीयूष गोयल यांनी शुक्रवारी नवी दिल्ली येथे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) च्या 98 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित केले.
गोयल म्हणाले की, भारताच्या संस्कृतीच्या मूल्यांमध्ये आत्मनिर्भरतेची कल्पना केंद्रस्थानी आहे, त्यांनी भगवद्गीतेतील संदर्भ आणि महात्मा गांधींनी स्वदेशीवर भर दिला होता, याची आठवण करून दिली. ते म्हणाले की, आत्मनिर्भरतेने ऐतिहासिकद़ृष्ट्या भारताच्या प्रगतीला मार्गदर्शन केले आहे आणि देशाच्या आर्थिक धोरणात ते अजूनही केंद्रस्थानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने आत्मनिर्भरतेवर लक्ष केंद्रित केल्याने हे स्वप्न अधिक बळकट झाले आहे.
तरुण लोकसंख्या, वाढती डिजिटलता आणि प्रतिभेच्या समूहामुळे भारताच्या नवोन्मेष आणि तंत्रज्ञानातील ताकदीवर त्यांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले की, भारतातील मोठ्या संख्येने ‘स्टेम’ पदवीधर आणि व्यापक इंटरनेटमुळे उपयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, रोबोटिक्स आणि डीप-टेक इनोव्हेशन यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये मजबूत क्षमता निर्माण होते. त्यांनी नमूद केले की, अलीकडेच जाहीर केलेला 12 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा संशोधन, विकास आणि नवोन्मेष (आरडीआय) निधी, स्टार्टअप्स आणि डीप-टेक उद्योगांना सतत पाठिंबा देण्यासह, भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेला आणखी गती देईल.