नवी दिल्ली : केंद्र सरकारने डिझेलवरील निर्यात शुल्क वाढवून ५५.५ रुपये प्रति लिटर, तर विमान इंधनावरील वरील शुल्क ४२ रुपये प्रति लिटर केले. मात्र, पेट्रोलवरील शुल्क कायम आहे, यामध्ये कोणतीही वाढ सरकारने केली नाही. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील निर्यात शुल्कात वाढ केली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "तात्काळ प्रभावाने" लागू होणाऱ्या या निर्णयाचा उद्देश, बदलत्या जागतिक ऊर्जा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करणे आणि किमतींमधील तफावतीचा निर्यातदारांना अवाजवी फायदा घेऊ न देणे हा आहे.
सरकारने हाय-स्पीड डिझेलवरील 'रस्ते आणि पायाभूत सुविधा उपकर' देखील वाढवला आहे. या सुधारित रचनेमुळे हाय-स्पीड डिझेलवरील एकूण निर्यात शुल्क प्रभावीपणे वाढून ५५.५ रुपये प्रति लिटर झाले आहे; यापूर्वी हे शुल्क २१.५ रुपये प्रति लिटर होते. त्याचप्रमाणे, सुधारित अधिसूचनेनुसार 'एव्हिएशन टर्बाइन फ्युएल' वरील शुल्क २९.५ रुपये प्रति लिटरवरून वाढवून ४२ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे.