देशातील तीन मृत्यूंमागे एकाचा मृत्यू हृदयविकाराने  pudhari photo
राष्ट्रीय

Heart disease deaths : देशातील तीन मृत्यूंमागे एकाचा मृत्यू हृदयविकाराने

रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाचा धक्कादायक अहवाल; तरुण वयातील मृत्यूचे प्रमाणही वाढले

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारतातील मृत्यूदरासंदर्भात जाहीर झालेल्या एका अहवालाने धोक्याची घंटा वाजवली आहे. देशात होणार्‍या प्रत्येक तिसर्‍या मृत्यूमागे हृदयविकार (हार्ट अटॅक आणि इतर हृदयविकार) कारणीभूत असल्याचे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाच्या अहवालात म्हटले आहे.

या अहवालात म्हटल्यानुसार, भारतात सुमारे 31 टक्के मृत्यू हे हृदयाशी संबंधित आजारांमुळे होत आहेत. निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहाराचा अभाव, तसेच वाढता तणाव हे हृदयविकार वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत. सध्याच्या जीवनशैलीमुळे हे प्रमाण भविष्यात आणखी वाढू शकते. अहवालातील अभ्यासकांनी स्पष्ट केले की, मृत्यूचे कारण वर्गीकरण कधी कधी चुकीचेही असू शकते, तरीही हे निष्कर्ष राष्ट्रीय मृत्यूस्थिती आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या आव्हानांचा अंदाज लावण्यासाठी महत्त्वाचे ठरतात.

तज्ज्ञांच्या मते, वाढत्या हृदयविकाराच्या घटनांमुळे सर्व नागरिकांनी आपली जीवनशैली, आहार आणि आरोग्याबाबत अधिक सजग राहण्याची नितांत गरज आहे. भारतासारख्या तरुण देशासाठी हार्ट अटॅक आणि हृदयविकार ही गंभीर आरोग्य समस्या ठरत आहे. लहान वयातही हृदयविकाराचे प्रमाण वाढले असून, लोकांना आरोग्यदायी जीवनशैलीची काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

तरुणांचाही होतोय अकाली मृत्यू

30-35 वर्षे वयातील, स्वतःला फिट समजणारे युवकही अचानक हार्ट अटॅकने दगावत आहेत. इतकेच नव्हे, तर काही प्रकरणांमध्ये 20 वयाच्या आतील युवकांतही हृदयविकाराचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. दरवर्षी लाखो भारतीय हृदयविकारामुळे अकाली मृत्युमुखी पडत असून, तरुणांचे प्रमाण जास्त असल्याचे यामध्ये म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT