नवी दिल्ली : भारताने मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात लक्षणीय प्रगती केली आहे. यामुळे आपला देश जगातील दुसरा सर्वात मोठा मोबाइल उत्पादक देश बनला आहे, अशी माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी दिली. देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राशी संबंधीत माहिती केंद्रीय मंत्र्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी गेल्या दशकभरातील देशाच्या इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची माहिती दिली आहे.
पंतप्रधानांचे 'मेक इन इंडिया' व्हिजन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनण्यास मदत करत आहे. मेक इन इंडिया कार्यक्रम सुरू झाल्यापासून एका दशकातच आपल्या स्वावलंबनाला चालना देत आहे आणि उत्पादन वाढवत आहे. तर रोजगारही निर्माण करत आहे, असे वैष्णव म्हणाले. 'मेक इन इंडिया'मुळे चार्जर, बॅटरी, कॅमेरा मॉड्यूल, डिस्प्ले मॉड्यूल इत्यादी प्रमुख इलेक्ट्रॉनिक्सचे देशांतर्गत उत्पादन वाढले आहे, असे ते म्हणाले. भारत सेमीकंडक्टर चिप्स आणि इतर बारीक घटकांच्या विकासावर लक्ष केंद्रित करून उत्पादनाची मूल्य साखळी अधिक खोलवर नेत आहे, असे वैष्णव म्हणाले.
२०१४-१५ मध्ये भारतात विकल्या जाणाऱ्या मोबाईल फोनपैकी फक्त २६ टक्के फोन भारतात बनवले जात होते, उर्वरित आयात केले जात होते. आज भारतात विकल्या जाणाऱ्या ९९.२ टक्के मोबाईल फोन भारतात बनवले जातात. मोबाईल फोनचे उत्पादन मूल्य आर्थिक वर्ष २०१४ मध्ये १८,९०० कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२४ मध्ये तब्बल ४,२२,००० कोटी रुपयांवर पोहोचले आहे, असे ते म्हणाले. २०१४ मध्ये, भारतात फक्त २ मोबाइल उत्पादक कंपन्या होत्या. मात्र, आज देशात ३०० हून अधिक मोबाईल उत्पादक कंपन्या आहेत.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतात दरवर्षी ३२५ ते ३३० दशलक्षाहून अधिक मोबाईल फोन तयार केले जातात आणि सरासरी एक अब्ज मोबाईल फोन वापरात आहेत. भारतीय मोबाईल फोनने देशांतर्गत बाजारपेठ जवळजवळ व्यापली आहे आणि त्यामुळे मोबाईल फोनच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. २०१४ मध्ये जवळजवळ अस्तित्वात नसलेली निर्यात आता १,२९,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्राच्या विस्तारामुळे रोजगार निर्मितीत वाढ झाली असल्याचे ते म्हणाले. या क्षेत्रात मागच्या दशकात सुमारे १२ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, असे ते म्हणाले.