वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : जपानला मागे टाकून भारतीय अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) सोमवारी आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताच्या विकास दरवाढीचा अंदाज 0.7 टक्क्याने वाढवून 7.3 टक्के केला आहे.
यापूर्वी ऑक्टोबरमध्ये नाणेनिधीने हा अंदाज 6.6 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला होता. आता नाणेनिधीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारताचा विकास दर अपेक्षेपेक्षा खूप चांगला राहिला आहे. विशेषतः, आर्थिक वर्ष 2025-26 च्या तिसर्या आणि चौथ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने उत्तम कामगिरी बजावली. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. नाणेनिधीने केवळ चालू आर्थिक वर्षासाठीच नव्हे, तर पुढील आर्थिक वर्षासाठीही भारताच्या विकास दराचा अंदाज वाढवला आहे. 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार्या आर्थिक वर्ष 2026-27 साठी भारताच्या ‘जीडीपी’वाढीचा अंदाज 6.2 वरून वाढवून 6.4 टक्के करण्यात आला आहे. नाणेनिधीचे म्हणणे आहे की, 2027-28 पर्यंत हा विकास दर पुन्हा 6.4 टक्क्यांच्या आसपास स्थिर होऊ शकतो.
देशाच्या सांख्यिकी मंत्रालयानेही चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 7.4 टक्के दराने वाढू शकते, असा अंदाज नुकताच वर्तवला होता. 2024-25 या वर्षात हा दर 6.5 टक्के होता. जुलै ते सप्टेंबर 2025 च्या तिमाहीत भारताचा विकास दर 8.2 टक्के नोंदवला गेला. तसेच, एप्रिल-सप्टेंबरच्या पहिल्या सहामाहीत सरासरी वाढ 8 टक्के राहिली आहे. यावरून असे दिसून येते की, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात वाढ कायम आहे.
महागाईपासूनही दिलासा मिळणार
नाणेनिधीने महागाईबाबत सकारात्मक द़ृष्टिकोन व्यक्त केला आहे. त्यानुसार 2025 मध्ये खाद्यपदार्थांच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई कमी होईल. उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांमध्ये सरासरी वाढ 4 टक्क्यांहून अधिक असेल. यापैकी भारत सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनला असून, भारताची ही प्रगती देशांतर्गत वाढत्या मागणीमुळे होत चालली आहे.