नवी दिल्ली : सोन्यावरील आयात शुल्क दुपटीहून अधिक वाढविल्यानंतर आयातीत मोठी घसरण झाली आहे. आता दरमहा सोने आयात ७० ते १०० वरून २५ ते ३० टनांवर घसरली असल्याची माहिती केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिली.
मौल्यवान धातूंची आयात रोखणे, परकीय चलन साठ्यावरील ताण कमी करणे आणि आयातीवरील मोठ्या खर्चाचा परिणाम कमी करणे या उद्देशाने सरकारने सोन्यावरील आयात शुल्क ६ टक्केवरून १५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. सोन्याच्या किमतीतील वाढ, दागिन्यांची कमी झालेली मागणी आणि जागतिक स्तरावर सोन्याचा पुनर्वापर (रिसायकलिंग) वाढणे यांसारख्या घटकांमुळेही सोन्याच्या आयातीत घट झाली आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या व्यापार आकडेवारीनुसार, एप्रिल २०२६ मध्ये सोन्याची आयात सुमारे ५.६३ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी होती. शुल्क वाढीनंतर मे २०२६ मध्ये ती घसरून सुमारे ३.४२ अब्ज डॉलरवर आली आहे.
सूत्राने सांगितले की, सोन्याच्या वाढलेल्या किमतींमुळे दागिन्यांची मागणीही मंदावली आहे. तर जागतिक स्तरावर सोन्याचा पुनर्वापर वाढला आहे.