नवी दिल्ली; वृत्तसंस्था : युद्धाच्या सावटात येत्या एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत आहे. या खडतर स्थितीतही ‘एस अँड पी ग्लोबल’ने भारतीय अर्थव्यवस्था 2026-27 मध्ये 7.1 टक्क्यांनी वाढेल, असे भाकीत केले आहे. विशेष म्हणजे पूर्वीच्या अंदाजात 0.40 टक्क्याची वाढ केली आहे.
मार्च 2027 अखेरीस संपणार्या आर्थिक वर्षात भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) 7.1 टक्के राहील, असा अंदाज वर्तविला आहे. म्हणजेच, चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत अर्थगतीचा वेग अर्धा टक्क्याने घटेल, असे ‘एस अँड पी ग्लोबल’ने म्हटले आहे. टिकून असलेली देशांतर्गत मागणी, खासगी गुंतवणुकीत झालेली वाढ आणि वाढलेली निर्यात, यामुळे अर्थगतीला चालना मिळाली आहे. मात्र, जागतिक अस्थिरतेचा धोका अर्थव्यवस्थेसमोर आहे.
इंधन दरवाढीचा दुहेरी धोका
इंधन पुरवठा आणि किंमत अशीच राहिल्यास जपान आणि भारतासारख्या सर्वाधिक आयात करणार्या देशांतील इंधनाच्या किमती वाढतील. सर्वच भार ग्राहकांवर टाकला जाणार नाही. दीर्घकाळ स्थिती अशीच राहिल्यास त्याचा निश्चितच परिणाम संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थांवर पडेल.