पंतप्रधान नरेंद्र मोदी  File Photo
राष्ट्रीय

भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिले : पंतप्रधान नरेंद्र मोदी

करण शिंदे

नवी दिल्ली : भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. जगाने शांततेच्या मार्गावर चालण्यासाठी बुद्धाच्या शिकवणीतून शिकले पाहिजे. जग अस्थिरतेने ग्रासलेले असताना बुद्ध केवळ प्रासंगिकच नाही तर गरजही आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. युद्धातून नाही तर भगवान बुद्धांच्या शिकवणीतून तोडगा काढून शांतता प्रस्थापित करा, असे आवाहन त्यांन संपूर्ण जगाला यावेळी केले. दिल्लीतील विज्ञान भवन येथे आंतरराष्ट्रीय अभिधम्म दिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी गौतम बुद्ध आणि पाली भाषा याविषयी आपले विचार मांडले. पाली भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याने अभिधम्म दिनाचे महत्व वाढले असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माझ्या जन्मापासूनच भगवान बुद्धांशी जुळण्याचा प्रवास सुरू झाला होता आणि आजही सुरू आहे. स्वातंत्र्यापूर्वी आक्रमकांनी भारताची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. नंतर गुलामा मानसिकतेने ग्रस्त असलेल्या लोकांनी हे केले. एका गटाने देश ताब्यात घेतला आणि आपल्या वारशाच्या विरुद्ध दिशेने नेला, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पाली भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता देणे, ही भगवान बुद्धांच्या महान वारशाला श्रद्धांजली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भाषा हा सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा आहे. पाली भाषा जिवंत ठेवणे, भगवान बुद्धांचे वचन जिवंत ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक राष्ट्र आपला वारसा आपल्या अस्मितेशी जोडतो, दुर्दैवाने भारत या दिशेने खूप मागे पडला होता, पण देश आता न्यूनगंडातून मुक्त झाला आहे आणि मोठे निर्णय घेऊन प्रगतीच्या मार्गावर आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी शरद पौर्णिमा आणि वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी भगवान बुद्धांच्या सर्व अनुयायांना अभिधम्म दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान म्हणाले की, या महिन्यात भारत सरकारने पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मला आनंद आहे की आपल्या सरकारने आपल्या मूळ मूल्यांसह ही जबाबदारी उचलली आहे.

गेल्या १० वर्षांत भारतातील ऐतिहासिक बौद्ध स्थळांपासून ते जगभरातील विविध देशांमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले. नेपाळमधील भगवान बुद्धांच्या जन्मस्थानाला भेट देण्यापासून ते मंगोलियातील त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यापर्यंतची आठवण यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितली. भारत विकासाकडे वाटचाल करत असताना आणि आपली मुळे बळकट करत असताना, भारताच्या तरुणांनी केवळ विज्ञान आणि तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व केले पाहिजे असे नाही. तर संस्कृती आणि मूल्यांचा अभिमानही बाळगला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT