RBI reserve update | देशाच्या परकीय चलनसाठ्यात 60 हजार कोटींची वाढ! 
राष्ट्रीय

RBI reserve update | देशाच्या परकीय चलनसाठ्यात 60 हजार कोटींची वाढ!

पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना केलेल्या आवाहनाचा सकारात्मक परिणाम

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून, रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशाच्या परकीय चलन साठ्यात 6 अब्ज डॉलर्सहून अधिक, म्हणजेच तब्बल 60 हजार कोटी रुपयांची घसघशीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, सलग दोन आठवड्यांच्या घसरणीनंतर हा साठा पुन्हा एकदा वधारला आहे.

काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल-डिझेल, खाद्यतेल आणि सोने-चांदीचा वापर मर्यादित ठेवण्याचे तसेच परदेशी दौरे टाळण्याचे आवाहन केले होते. देशाचा परकीय चलन आणि सोन्याच्या रूपातील खजिना सुरक्षित राहावा, हा त्यामागील मुख्य हेतू होता. सरकारच्या या धोरणात्मक प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम आता आकडेवारीतून स्पष्टपणे दिसू लागला आहे.

गेल्या आठवड्यात झाली होती घसरण

आधीच्या आठवड्यात भारताच्या एकूण परकीय चलनसाठ्यात 7.79 अब्ज डॉलरची घट झाली होती आणि साठा 690.69 अब्ज डॉलरवर आला होता; मात्र त्यानंतरच्या आठवड्यात पुन्हा मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, 27 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा विक्रमी 728.49 अब्ज डॉलरवर पोहोचला होता. त्यानंतर पश्चिम आशियातील तणाव आणि रुपयावर वाढलेल्या दबावामुळे रिझर्व्ह बँकेला डॉलर विकून बाजारात हस्तक्षेप करावा लागला होता. त्यामुळे साठ्यात घट दिसून आली होती.

आरबीआयच्या माहितीनुसार, परकीय चलन साठ्यातील सर्वात मोठा घटक असलेल्या फॉरिन करन्सी असेटमध्येही (एफसीए) वाढ झाली आहे. 8 मे रोजी संपलेल्या आठवड्यात एफसीएमध्ये 562 दशलक्ष डॉलरांची वाढ होऊन ती 552.38 अब्ज डॉलरांवर पोहोचली. यामध्ये युरो, पाऊंड, येन यांसारख्या नॉनअमेरिकन चलनांच्या मूल्यातील चढ-उतारांचाही परिणाम समाविष्ट असतो.

सोन्याच्या साठ्यात मोठी वाढ

देशाच्या सुवर्णसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. आरबीआयच्या आकडेवारीनुसार, आठवडाभरात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 5.63 अब्ज डॉलरनी वाढून 120.85 अब्ज डॉलरवर गेले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे भारताची राखीव स्थितीही 12 दशलक्ष डॉलरनी वाढून 4.87 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्याचे संकेत

परकीय चलन साठ्यातील वाढ ही भारतीय अर्थव्यवस्थेस उभारी मिळण्याचे संकेत मानले जात आहेत. परकीय चलन साठा भक्कम असल्यास आयात खर्च नियंत्रित ठेवणे, रुपयावरील दबाव कमी करणे आणि जागतिक आर्थिक संकटांचा सामना करणे देशासाठी सोपे होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT