पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील पहिल्या स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सर्व्हर ‘आदिपोली’ चे मानेसर येथे शुक्रवारी अनावरण केले.
'आदिपोली' सर्व्हरमध्ये 8 GPU चा समावेश आहे आणि तो पूर्णतः भारतात डिझाइन करण्यात आला आहे. हे उपकरण भारताच्या प्रगत इलेक्ट्रॉनिक्स आणि AI क्षेत्रातील वाढत्या ताकदीचे प्रतीक असल्याचं मंत्री वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. हा AI सर्व्हर VVDN टेक्नोलॉजीज या भारतीय कंपनीने विकसित केला आहे.
वैष्णव यांनी VVDN टेक्नोलॉजीजच्या प्रयत्नांचे कौतुक करत 'आदिपोली'च्या निर्मितीला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेच्या दिशेने मोठं पाऊल म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, भारतात बनणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे आता जगभरात विश्वासार्ह ठरत असून स्पर्धात्मकतेच्या दृष्टीनेही सक्षम आहेत. बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण करण्यावर भारताचे लक्ष आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लोकप्रिय होत आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे, यावर त्यांनी भर देत गेल्या दशकात भारताचे इलेक्ट्रॉनिक उत्पादन आणि निर्यात अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले.
शुक्रवारी मानेसर येथे व्हीव्हीडीएन टेक्नॉलॉजीजच्या एसएमटी (सरफेस माउंट टेक्नॉलॉजी) लाईनचे उद्घाटन करताना मंत्री वैष्णव म्हणाले की, गेल्या दशकात भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन पाच पटीने वाढून ११ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या कालावधीत निर्यात सहा पटीने वाढली आहे, जी ३.२५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. संपूर्ण क्षेत्रासह, २५ लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. AI-सक्षम कॅमेरे, ऑटोमोबाईल इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम नेटवर्क उपकरणे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी जटिल उत्पादने भारतात विकसित केली जात आहेत. यामुळे भारताचा ‘इलेक्ट्रॉनिक हब’ म्हणून उभा राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असे वैष्णव म्हणाले.
या कार्यक्रमात मेकॅनिकल इनोव्हेशन पार्क आणि नवीन SMT (Surface Mount Technology) उत्पादन लाइनचे उद्घाटनही करण्यात आले. सुमारे 1,50,000 चौरस फूट क्षेत्रात वसलेला हा पार्क भारतात मदरबोर्ड, नेटवर्किंग उपकरणे आणि AI सर्व्हरसारख्या प्रगत उत्पादनांची निर्मिती करायला सक्षम ठरणार आहे.