राष्ट्रीय

भारताची जागतिक दूरसंचार महाशक्तीकडे वाटचाल; BSNL च्या खासगीकरणाचा प्रश्नच नाही : ज्योतिरादित्य शिंदे

देशातील ९९.९ टक्के जिल्ह्यांपर्यंत ५जी सेवा पोहोचली, १२० कोटी ग्राहकांपैकी ४० कोटी नागरीकांडून ५जी चा वापर.

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत दूरसंचार क्षेत्रात जागतिक स्तरावर वेगाने पुढे जात असून देशाची ओळख एक मजबूत टेलीकॉम शक्ती म्हणून निर्माण होत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी संसदेत केले. बीएसएनएलच्या खासगीकरणाबाबत कोणताही विचार नसून ही संस्था जनतेच्या सेवेसाठीच कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितले की, गेल्या १२ वर्षांत देशात दूरसंचार क्षेत्रात मोठा बदल झाला. पूर्वी डेटा दर प्रत्येक जीबी सरासरी २९० रुपये होता, तो आता केवळ ८ रुपयांवर आला आहे, म्हणजेच सुमारे ९७ टक्के घट झाली आहे. देशातील ९९.९ टक्के जिल्ह्यांपर्यंत ५जी सेवा पोहोचली असून १२० कोटी ग्राहकांपैकी ४० कोटी नागरिक ५जी चा वापर करत आहेत. हा जगातील सर्वात वेगवान ५जी विस्तारांपैकी एक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सीमावर्ती भागातील कनेक्टिव्हिटीमध्येही मोठी वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०१४ मध्ये केवळ ४२ टक्के सीमावर्ती गावांमध्ये दूरसंचार सुविधा उपलब्ध होती, ती आता ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. देशातील १७,६०० पैकी १७,२२२ गावे कनेक्टिव्हिटीशी जोडली गेली आहेत. उर्वरित गावांमध्येही ४जी सॅच्युरेशन योजनेअंतर्गत सुविधा पुरवली जात आहे.

‘वाइब्रंट व्हिलेज’ योजनेअंतर्गत सीमावर्ती गावांचा सर्वांगीण विकास केला जात असून त्यांना ‘पहिले गाव’ म्हणून विकसित केले जात आहे. तसेच भारताने स्वदेशी ४जी टेलीकॉम स्टॅक विकसित करून तांत्रिक स्वावलंबन सिद्ध केले आहे. बीएसएनएल मार्फत १ लाख स्वदेशी ४जी टॉवर्स उभारण्यात आले असून आणखी २२ हजार टॉवर्स उभारण्याचे नियोजन आहे.

भारत आता केवळ दूरसंचार सेवांचा वापर करणारा देश नसून उपकरण निर्मितीतही आघाडीवर येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. लवकरच स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित अधिक सक्षम ५जी सेवा देशभर उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT