नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जागतिक स्तरावर भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढत्या सामर्थ्याला एक मोठी पोचपावती मिळाली आहे. तब्बल 18 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रतिष्ठित जागतिक पतमानांकन संस्था ‘एस अँड पी ग्लोबल रेटिंग्ज’ने भारताच्या सार्वभौम पतमानांकनात वाढ केली आहे. भारताचे रेटिंग ‘बीबीबी वजा’ (सर्वात कमी गुंतवणूक श्रेणी) वरून बीबीबी (मध्यम गुंतवणूक श्रेणी) करण्यात आले असून, देशाचा द़ृष्टिकोन ‘स्थिर’ ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे भारताच्या आर्थिक स्थिरतेवर आणि भविष्यातील प्रगतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
एस अँड पीच्या या निर्णयामागे भारताची मजबूत आर्थिक लवचिकता, सातत्यपूर्ण वित्तीय शिस्त आणि पायाभूत सुविधांवर दिला जाणारा भर ही प्रमुख कारणे आहेत. अमेरिकेने भारतावर अतिरिक्त 50% शुल्क लादले असले, तरी त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम नगण्य असेल, असेही एस अँड पीने स्पष्ट केले आहे. याचे कारण म्हणजे भारताची अर्थव्यवस्था व्यापारावर कमी आणि देशांतर्गत मागणीवर अधिक अवलंबून आहे. देशाच्या आर्थिक वाढीपैकी सुमारे 60% वाटा हा देशांतर्गत उपभोगाचा आहे.
एस अँड पीने भारताच्या अल्पकालीन रेटिंगमध्येही ए-3 वरून ए-2 अशी सुधारणा केली आहे. संस्थेच्या मते, भारत सरकारने वित्तीय तूट कमी करण्याच्या दिशेने उचललेली पावले आणि पायाभूत सुविधांवर केलेला खर्च यामुळे देशाच्या दीर्घकालीन विकासाला गती मिळेल.
एस अँड पीने पुढील तीन वर्षांत भारताचा विकास दर सरासरी 6.8% राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, तो आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सर्वाधिक असेल.
पतमानांकनात वाढ : ‘बीबीबी-’ वरून ‘बीबीबी’
द़ृष्टिकोन : स्थिर
महत्त्व : 18 वर्षांनंतर मिळालेली पहिली वाढ
मजबूत आर्थिक वाढ : पुढील 3 वर्षांत सरासरी 6.8% विकास दराचा अंदाज
आर्थिक लवचिकता : जागतिक आव्हानांना तोंड देण्याची क्षमता
सातत्यपूर्ण वित्तीय शिस्त : सरकारच्या खर्चावर आणि कर्जावर नियंत्रण
देशांतर्गत मागणी : अर्थव्यवस्थेचा 60% आधार देशांतर्गत उपभोगावर
स्वस्त परदेशी कर्ज : भारतीय कंपन्यांसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध
गुंतवणूकदारांचा विश्वास वाढणार : परदेशी गुंतवणुकीला चालना
निर्यातदारांना बळ : अमेरिकेच्या शुल्काचा प्रभाव कमी करण्यास मदत
यापूर्वी 1990 मध्ये भारताला ‘बीबीबी’ रेटिंग होते.
भारत 2022 पासून जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे.