नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात गुरुवारी दूरध्वनीवरुन संवाद झाला. दोन्ही नेत्यांनी यावेळी तंत्रज्ञान, ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा, लष्करी क्षेत्रांतील सहकार्य वाढवण्यासह विविध विषयांवर चर्चा केली. विशेष म्हणजे, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत दौऱ्यानंतर काही दिवसांनी ही चर्चा झाली आहे.
दोन्ही देश जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्र : पंतप्रधान मोदी
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अत्यंत सौहार्दपूर्ण आणि फलदायी चर्चा झाली. आम्ही द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला आणि प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा केली. भारत आणि अमेरिका जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करत राहतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले.
दोन्ही नेत्यांनी भारत-अमेरिकेतील जागतिक धोरणात्मक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेतला आणि सर्व क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य सातत्याने मजबूत होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांमधील गती कायम ठेवण्यावर देखील चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली. भविष्यासाठी दोन्ही देशांची भागीदारी अशीच कायम ठेवण्यास दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि समान हितसंबंधांना पुढे नेण्यासाठी दोन्ही नेते एकत्रितपणे काम करण्यास सहमत झाले.