Fastest Interceptor Drone | सर्वाधिक वेगवान इंटरसेप्टर ड्रोन सज्ज! 
राष्ट्रीय

Fastest Interceptor Drone | सर्वाधिक वेगवान इंटरसेप्टर ड्रोन सज्ज!

हैदराबादच्या स्टार्टअपची किमया, वेग प्रतितास ४९८ किमी

पुढारी वृत्तसेवा

हैदराबाद; वृत्तसंस्था : शत्रू देशांच्या क्षेपणास्त्रांना हवेतच उद्‌ध्वस्त करण्याच्या हेतूने येथील अपोलियन डायनॅमिक्स या स्टार्टअपणे भारतातील सर्वात वेगवान इंटरसेप्टर ड्रोन आहुती एमके टू तयार केला असून, त्याचा वेग ४९८ किलोमीटर प्रतितास आहे. विशेष म्हणजे याची दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌’नेही घेतली आहे.

अपोलियन डायनॅमिक्सचे संस्थापक जयंत खत्री यांनी सांगितले की, या इंटरसेप्टर ड्रोनने स्वतःच्या प्रोटोटाईप मॉडेलचा ३२५ किलोमीटर प्रतितास वेगाचा जुना विक्रम मोडला आहे. सामान्यतः ड्रोन वस्तू उचलण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी वापरले जातात. तथापि, आहुती इंटरसेप्टर ड्रोनची रचना शत्रूच्या ड्रोनला किंवा क्षेपणास्त्राला त्वरित पाडण्यासाठी केलेली आहे.

कमी खर्चात जास्त ताकद

कंपनीने या इंटरसेप्टर ड्रोनची चाचणी भारतीय लष्कराच्या मदतीने बबीना आणि गोपालपूर फायरिंग रेंजमध्ये केली आहे. यामागील मुख्य उद्देश कमी खर्चात जास्त मारक क्षमता असलेली शस्त्रे बनवणे असा आहे. त्यामुळे लष्कराचे बजेट न वाढवता देशाला प्रगत तंत्रज्ञान मिळणार आहे.

वेग आणि चपळतेचा मिलाफ

हा इंटरसेप्टर ड्रोन हवेत उडणाऱ्या क्षेपणास्त्रासारखे काम करतो. याचे प्रमुख काम म्हणजे हवेत येणाऱ्या शत्रूच्या ड्रोन किंवा क्षेपणास्त्राचा पाठलाग करून त्याला वाटेतच नष्ट करणे. म्हणूनच यात सर्वाधिक वेग आणि चपळता आवश्यक असते.

या इंटरसेप्टर ड्रोनला कमाल वेग देण्यासाठी त्याचे इंजिन, मोटर आणि बॉडीमध्ये मोठे बदल करण्यात आले. मुख्य म्हणजे अपेक्षित परिणाम येण्यासाठी त्याचे वेगवेगळे दहा मॉडेल्स तयार करण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली. तो एका वेळी ४०० अँपिअर विजेची शक्ती खेचतो आणि यामुुळे त्याला जबरदस्त वेग मिळतो.

अत्याधुनिक ड्रोनचा सामना करण्याची योजना

कंपनीचे म्हणणे आहे की, युद्धाच्या बदलत्या पद्धती पाहता इंटरसेप्टर ड्रोनचा वेग वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. अलीकडील जागतिक संघर्षांमध्ये शाहेद -१६ सारख्या स्वस्त आणि धोकादायक ड्रोन्सचा वापर वेगाने वाढला आहे. ‘आहुती एमके टू’चे मुख्य काम शत्रूच्या ड्रोन्सच्या जवळ पोहोचून त्यांना त्वरित हवेत उडवून देणे हे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT