India disaster ranking file photo
राष्ट्रीय

India disaster ranking: आपत्तीग्रस्त देशांच्या यादीत भारत नवव्या स्थानी; ३० वर्षांत ८०,००० बळी! पाहा धक्कादायक अहवाल

गेल्या तीन दशकांत हवामान आपत्तींनी सर्वाधिक प्रभावित झालेल्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

मोहन कारंडे

India disaster ranking:

नवी दिल्ली : गेल्या तीन दशकांत हवामान आपत्तींनी सर्वाधिक प्रभावित झालेल्या दहा देशांमध्ये भारताचा समावेश आहे. पर्यावरणीय थिंक टँक जर्मनवॉचच्या नवीन अहवालानुसार, १९९५ ते २०२४ दरम्यान, भारतात सुमारे ४३० वेळा हवामान-संबंधित आपत्ती आल्या. यात ८० हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला आणि १.३ अब्जाहून अधिक लोकांना फटका बसला.

आपत्तींमुळे भारताला १४ लाख कोटी रुपयांचे नुकसान

या आपत्तींमुळे भारताचे अंदाजे १७० अब्ज डॉलर्स (सुमारे १४ लाख कोटी रुपये) आर्थिक नुकसान झाले आहे. मंगळवारी ब्राझीलमधील बेलेम येथे झालेल्या COP30 परिषदेत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यात म्हटले आहे की, भारतात पूर, चक्रीवादळे, दुष्काळ आणि तीव्र उष्णता लाटांचा मोठा फटका बसला असून, यामुळे विकास आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

अहवालातील ठळक मुद्दे:

  • १९९५ ते २०२४ या काळात, भारतात सुमारे ४३० मोठ्या हवामान घटना घडल्या.

  • यामध्ये ८०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर १.३ अब्जाहून अधिक लोकांना या आपत्तींचा सामना करावा लागला.

  • या नैसर्गिक आपत्तींमुळे भारताला अंदाजे १७० अब्ज डॉलर (सुमारे १४ लाख कोटी रुपये) इतके मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे.

  • सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांच्या जागतिक यादीत भारताचा क्रमांक नववा आहे.

भारतातील आपत्तींची लांबलचक यादी

अहवालात भारताच्या अनेक विनाशकारी घटनांचा उल्लेख आहे. यात १९९८ चे गुजरातमधील चक्रीवादळ, १९९९ चे ओडिशाचे सुपर चक्रीवादळ, २०१३ मध्ये उत्तराखंडमधील पूर आणि अलिकडच्या वर्षांतील जीवघेण्या उष्णता लाटा यांचा समावेश आहे. या सर्व घटनांमुळे भारताची हवामान धोक्यातील क्रमवारी उंचावली आहे.

हवामान आपत्तींची जागतिक स्थिती

१९९५ ते २०२४ दरम्यान, जगात हवामानामुळे घडलेल्या ९,७०० हून अधिक घटनांची नोंद झाली, ज्यात ८.३ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि ५.७ अब्ज लोक प्रभावित झाले. एकूण आर्थिक नुकसान $४.५ ट्रिलियन डॉलरहून अधिक अंदाजित आहे.

सर्वाधिक प्रभावित १० देश

या यादीत पहिल्या क्रमांकावर डॉमिनिका आहे, त्यानंतर म्यानमार, होंडुरास, लिबिया, हैती, ग्रेनेडा, फिलीपीन्स, निकाराग्वा, भारत आणि बहामास यांचा समावेश आहे.

गरीब देशांवर सर्वाधिक परिणाम

या अहवालात म्हटले आहे की, विकसनशील देश अजूनही हवामान आपत्तींनी सर्वाधिक प्रभावित आहेत, कारण त्यांच्याकडे परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी आणि पुनर्वसनासाठी संसाधनांची कमतरता आहे. जर्मनवॉचने म्हटले आहे की २०२४ मधील एल निनो परिस्थितीमुळे हवामानातील असामान्य बदल घडून आले असले तरी, खरा दोषी मानवनिर्मित हवामान बदल होता, ज्यामुळे उष्णतेच्या लाटा, वादळे आणि पूर यांची तीव्रता वाढली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT