Cancer Treatment In India file photo
राष्ट्रीय

Cancer Treatment In India | ९ दिवसांत रक्ताचा कर्करोग बरा...! भारतीय डॉक्टरांना मोठे यश

ICMR cancer treatment |भारतीय डॉक्टरांनी अवघ्या ९ दिवसांत CAR-T थेरपीद्वारे रक्ताच्या कर्करोगावर यशस्वी उपचार केले आहेत. या थेरपीमुळे उपचार खर्च ९० टक्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

मोहन कारंडे

Cancer Treatment In India

दिल्ली : भारतीय डॉक्टरांनी अवघ्या नऊ दिवसांत रक्तचा कर्करोग (ब्लड कॅन्सर) पूर्णपणे बरा करण्यात यश मिळवलं आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच CAR-T पेशी (CAR-T Cells) रुग्णालयातच तयार करून थेट रुग्णाला देण्यात आल्या. दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) ने ही वैद्यकीय क्षेत्रातील मोठी कामगिरी केली आहे. या उपचारानंतर ८० टक्के रुग्णांमध्ये १५ महिन्यांनंतरही कर्करोग पुन्हा दिसून आला नाही, असा दावा आयसीएमआरने केला आहे.

ICMR कडून माहिती प्रसिद्ध 

आयसीएमआरच्या मते, या चाचणीतून कर्करोगाचा उपचार स्वस्त, जलद आणि रुग्णांच्या जवळ कसा करता येतो हे दिसून येते. भारत आता स्वदेशी जैव-थेरपी विकसित करण्यात आघाडीवर आहे. ही कामगिरी जागतिक स्तरावर देखील महत्त्वाची मानली जात आहे. आयसीएमआर आणि सीएमसी वेल्लोर यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही चाचणी पार पडली. या प्रकल्पाला ‘वेलकार्टी’ (VELCARTY) असं नाव देण्यात आलं आहे. याचे परिणाम ‘मॉलिक्युलर थेरपी ऑन्कोलॉजी’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

कोणत्या प्रकारच्या कर्करोगांवर प्रयोग केला?

जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या तपशीलांनुसार, डॉक्टरांनी तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (ALL) आणि मोठ्या बी-सेल लिम्फोमा (LBCL) ग्रस्त रुग्णांवर CAR-T थेरपीची चाचणी केली. या प्रक्रियेत, रुग्णाच्या स्वतःच्या टी-पेशीला (रोगप्रतिकारक पेशी) कर्करोगाशी लढण्यायोग्य बनवलं जात. भारतातील CAR-T थेरपीची ही पहिलीत चाचणी नाही. इम्युनो अॅक्ट आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांनी एकत्रितपणे पहिली स्वदेशी थेरपी विकसित केली होती, ज्याला २०२३ मध्ये केंद्राकडून मान्यता देखील मिळाली होती.

पहिल्या चाचणीत मिळाले यश

ICMR च्या अहवालानुसार, आयसीएमआरने म्हटले आहे की तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (ALL) कर्करोगाने ग्रस्त सर्व रुग्ण बरे झाले आहेत, तर मोठ्या बी-सेल लिम्फोमा (LBCL) रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण रोगमुक्त झाले आहेत. दोन्ही प्रकारच्या रुग्णांवर दीर्घकाळ लक्ष ठेवण्यात आले, १५ महिन्यांनंतरही ८० टक्के रुग्ण अजूनही कर्करोगमुक्त आहेत. दरम्यानच्या काळात रुग्णांमध्ये थेरपीचे सौम्य दुष्परिणाम दिसून आले आहेत, परंतु न्यूरोटॉक्सिसिटी म्हणजेच मज्जासंस्थेवर परिणाम झालेला आढळला नाही.

जागतिक स्तरावर ४० दिवसांचा विक्रम

सीएमसी वेल्लोर येथील डॉक्टरांनी सांगितले की, ही प्रक्रिया रुग्णालयातच स्वयंचलित मशीन वापरून करण्यात आली आणि त्यासाठी सुमारे नऊ दिवस लागले. तर जागतिक स्तरावर CAR-T थेरपीला किमान पाच आठवडे म्हणजेच ४० दिवस लागतात. भारतीय चाचणीत रुग्णांच्या ताज्या पेशींचा वापर करण्यात आला, ज्यामुळे जलद पुनर्प्राप्ती झाली. या प्रक्रियेची किंमतही परदेशी उपचारांपेक्षा ९० टक्यांनी कमी आहे, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

९० टक्क्यांपर्यंत खर्च वाचणार

भारतात कॅन्सरचा उपचार महाग आहे आणि बहुतांश रुग्णांकडे विमा नाही. या थेरपीमुळे उपचार खर्च ९० टक्यांपर्यंत कमी होऊ शकतो. जागतिक स्तरावर, CAR-T थेरपीची किंमत सुमारे ३ ते ४ कोटी रुपये आहे, ‘वेलकार्टी’ मॉडेलमुळे हा उपचार खूप कमी दरात उपलब्ध होणार आहे. आयसीएमआर ने सांगितलं की, भारतात दरवर्षी ५० हजार नवीन ल्युकेमिया रुग्ण आढळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT