नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत ‘एसआयआर’ आणि मत चोरीच्या विषयावर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी काढलेल्या रॅलीचा सर्वात मोठा फटका व्यापार्यांना बसला आहे. या रॅलीच्या काळात तब्बल अडीच लाख दुकाने बंद ठेवावी लागली आणि त्यामुळे १२ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय बुडाला, असा दावा चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (सीटीआय) या व्यापार्यांच्या संघटनेने केला आहे.
‘सीटीआय’चे चेअरमन बृजेश गोयल यांनी सोमवारी हा दावा केला. ‘सीटीआय’सोबतच देशातील सर्वात जुनी व्यापारी संघटना ‘किराणा कमिटी दिल्ली’ आणि ‘नटस् अँड ड्राई फ्रूटस् कौन्सिल’नेही या रॅलीमुळे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे.
विरोधी पक्षांनी रामलीला मैदानावर काढलेली रॅली आणि त्यापूर्वी राहुल गांधी यांनी काढलेला मार्च यामुळे मध्य दिल्ली अनेक तास जाम राहिली. तर दुसरीकडे, रॅलीदरम्यान दोन डझनहून अधिक बाजारपेठा बंद राहिल्या. रॅलीच्या काळात ग्राहकांपर्यंत पोहोचता न आल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे दिल्लीच्या व्यावसायिकांनी म्हटले आहे. ‘सीटीआय’चे चेअरमन बृजेश गोयल म्हणाले, राहुल गांधी यांच्या रॅलीमुळे रस्ते जाम झाले व गर्दीमुळे रामलीला मैदानालगतच्या काश्मिरी गेट, चांदणी चौक, भागीरथ पॅलेस, लाजपत मार्केट, करोलबाग, सदर बाजार, मीना बाजार, चावडी बाजार, पहाडगंज आणि कॅनॉट प्लेससह एकूण २५ बाजारपेठांमधील व्यवसाय ठप्प झाला. प्रमुख बाजारपेठांमधील सुमारे ८० टक्के दुकाने बंद राहिली. व्यापार थांबल्याने व्यावसायिकांचे १० ते १२ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले.
विरोधी पक्षांच्या रॅलीनंतर आता व्यापारी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर नाराज असून, सणासुदीच्या हंगामात झालेल्या व्यापाराच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी करत आहेत. व्यापाऱ्यांनी २४, २५, २८ ऑक्टोबर व शेवटी १ नोव्हेंबर असे तब्बल चार वेळा पत्र लिहून राहुल गांधींना रॅली पुढे ढकलण्याची किंवा रॅलीचे ठिकाण बदलण्याची विनंती केली होती. एवढे होऊनही राहुल गांधी रॅलीवर ठाम राहिल्याने फटका सहन करावा लागल्याने व्यापारी नाराज झाले आहेत.