राष्ट्रीय

INDIA Bloc Rally : ‘इंडिया आघाडीचा फुगा फुटला; १० लाखांचा दावा फोल, ४०% मैदान रिकामे!’ : रिकाम्या खुर्च्या दाखवून भाजपचा घणाघात

''नौटंकी करून कोणी पंतप्रधान होत नाही. 'पीएम' म्हणजे केवळ प्राईम मिनिस्टर नाही, तर 'पसीना और मेहनत' आहे. पंतप्रधान घाम गाळून आणि अहोरात्र मेहनत करून व्हावे लागते.''

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर शक्तीप्रदर्शनाचा आव आणणाऱ्या ‘इंडिया’ आघाडीच्या तथाकथित महारॅलीची पूर्णपणे हवा निघून गेली असून, ही सभा सपशेल ‘फ्लॉप शो’ ठरली आहे.’’ आशी बोचरी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. ‘‘१० लाख लोकांची गर्दी जमवण्याच्या बाता मारणाऱ्या काँग्रेसची आणि राहुल गांधींची नौटंकी जनतेसमोर उघडी पडली आहे’, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत थेट व्हिडिओ आणि छायाचित्रांचे पुरावे सादर करत केला.

पत्रकार परिषदेत संबित पात्रा म्हणाले की, ‘‘१० ते १२ एकरच्या रामलीला मैदानावर जेमतेम २८ हजार खुर्च्या मांडल्या होत्या, त्यापैकी ५ ते ७ हजार खुर्च्या अक्षरशः वाऱ्यावर रिकाम्या पडल्या होत्या. दुपारी साडेतीन ते चार या गर्दीच्या वेळेतही संपूर्ण मैदानाचा तब्बल ४० टक्के भाग पूर्णपणे मोकळा होता. १० लाख लोक कुठे होते? दाखवा आम्हाला ते लोक’’, असा संतप्त सवाल विचारत पात्रा यांनी, कॅमेऱ्याच्या कोनातून आणि ‘ट्रिक फोटोग्राफी’च्या जोरावर आभासी गर्दी दाखवून जनतेची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसने केल्याचा सणसणीत आरोप केला. डझनावारी पक्ष आणि त्यांचे झेंडे एकत्र करूनही विरोधकांना हे छोटे मैदान भरता आले नाही, यावरून जनतेने या बेगडी आघाडीला साफ नाकारल्याचे सिद्ध झाले आहे, असाही त्यांनी टोला लगावला.

राहुल गांधींना सुनावताना पात्रा यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत समाचार घेतला. ‘‘नौटंकी करून कोणी पंतप्रधान होत नाही. 'पीएम' म्हणजे केवळ प्राईम मिनिस्टर नाही, तर 'पसीना और मेहनत' आहे. पंतप्रधान घाम गाळून आणि अहोरात्र मेहनत करून व्हावे लागते,’’ असा टोला लगावला. राहुल गांधींच्या शॉपिंगच्या आवाहनावर पात्रा म्हणाले की, ‘‘ज्यांच्या पासपोर्टवर व्हिएतनाम आणि थायलंडचेच शिक्के असतात, ते स्थानिक बाजारपेठेत खरेदी करणार की संध्याकाळच्या विमानाने परदेशात उड्डाण करणार, हे संपूर्ण देशाला चांगलेच ठाऊक आहे.’’

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या राहुल गांधींवर पात्रा यांनी जोरदार पलटवार केला. ते म्हणाले की, ‘‘जर २०२४ ची निवडणूक बेकायदेशीर होती, तर त्या निवडणुकीतून निवडून आलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांचे खासदारही पूर्णपणे बेकायदेशीर ठरतात,’’ असा युक्तिवाद त्यांनी केला. ‘‘पराभवाच्या नैराश्यातून अडीच वर्षांनंतर न्यायालयात न जाता मैदानावर थयथयाट करणाऱ्या या नेत्यांकडे न्यायालयात आव्हान देण्याची हिंमत नाही,’’ असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

याच मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही राहुल गांधींना फटकारले. ‘‘राहुल गांधींना पंतप्रधान व्हायचे असेल, तर त्यांनी आयुष्यभर 'मॉक पार्लमेंट'मध्येच पंतप्रधान बनून समाधान मानावे, खऱ्या आयुष्यात त्यांची ती वेळ कधीही येणार नाही,’’ असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये जनतेने वारंवार नाकारलेले आणि पराभूत झालेले हताश चेहरे एकत्र येऊन देशात केवळ अराजकता पसरवण्याचा कुटील डाव रचत असल्याचा जोरदार हल्लाबोल भाजपने केला असून, रामलीला मैदानावरील रिकाम्या खुर्च्यांनी विरोधकांच्या पोटशूळाचे खरे रूप देशासमोर उघड केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT