India Belgium Partnership | भारत-बेल्जियम संबंधांना नवी दिशा : पंतप्रधान मोदी  
राष्ट्रीय

India Belgium Partnership | भारत-बेल्जियम संबंधांना नवी दिशा : पंतप्रधान मोदी

संरक्षण, ऊर्जा, सेमीकंडक्टर, व्यापारवाढीवर भर

पुढारी वृत्तसेवा

विजय जाधव

नवी दिल्ली : भारत आणि बेल्जियममधील द्विपक्षीय संबंध अधिक व्यापक व धोरणात्मक करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट वेव्हर यांनी गुरुवारी भर दिला. संरक्षण, स्वच्छ ऊर्जा, महत्त्वाची खनिजे, सेमीकंडक्टर, व्यापार, स्टार्टअप, सागरी क्षेत्र आणि संशोधन अशा विविध क्षेत्रांत सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील पाच वर्षांत भारत-बेल्जियम द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त निवेदनात दिली. बेल्जियमच्या पंतप्रधानांचे भारतातील पहिल्या भेटीबद्दल स्वागत करताना पंतप्रधान मोदी यांनी भारत-बेल्जियम संबंधांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा उल्लेख केला. पहिल्या महायुद्धात बेल्जियममध्ये हजारो भारतीय सैनिकांनी केलेला त्याग हा दोन्ही देशांच्या सामायिक स्मृतीचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांनी बार्ट वेव्हर यांचे स्वागत केले आणि संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित केले. शुक्रवारी बार्ट वेव्हर मुंबई दौऱ्यावर असणार आहेत.

अजित डोवाल यांनी सांगितल्या कोल्हापुरी चप्पलच्या आठवणी

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि भारताचे ‘स्पाय मास्टर’ अशी ओळख असलेले अजित डोवाल यांच्याशी परिचय देताना कोल्हापूरचा संदर्भ निघाला. कोल्हापुरी मटण आणि कोल्हापुरी चप्पल यासंदर्भातील दोन आठवणी त्यांनी दै. ‘पुढारी’ला सांगितल्या. आपण कोल्हापूरला आलो होतो आणि कोल्हापूर चप्पल खरेदी केले होते, असे सांगताना या आंतरराष्ट्रीय व्यवहारातील निष्णात राजनैतिक अधिकाऱ्याच्या डोळ्यात कोल्हापूरबद्दलचा जिव्हाळा दिसून आला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनीही कोल्हापूर आणि कोल्हापूरची खासियत याबद्दल भरभरून सांगितले.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून डॉ. प्रतापसिंह जाधव यांची आस्थेवाईकपणे विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव यांच्याकडे ‘‘बालासाहब कैसे है, उनको मेरा नमस्कार कहना’’, अशा शब्दांत दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक आणि चेअरमन (इमेरिटस्‌) डॉ. प्रतापसिंह जाधव यांची विशेष आठवण काढत आस्थेवाईकपणे चौकशी केली आणि त्यांच्यासाठी नमस्कार सांगितला. पंतप्रधानांनी बेल्जियमच्या पंतप्रधानांना दिलेल्या या खास माध्यान्ह भोजनासाठी दै. 'पुढारी'चे कार्यकारी संपादक विजय जाधव यांनाही निमंत्रित करण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT