पुढारी ऑनलाईन डेस्क : संरक्षण मंत्रालयाने हलक्या वजनाची १५६ स्वदेशी बनावटीचे लढाऊ हेलिकॉप्टर (LCH) प्रचंड खरेदी करण्यासाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत ६२,७०० कोटी रुपयांचे दोन करार केले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पहिला करार भारतीय हवाई दलाला (IAF) ६६ हलक्या वजनाच्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या पुरवठ्यासाठी आहे आणि दुसरा करार भारतीय लष्कराला ९० हलक्या वजनाच्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या पुरवठा करण्याबाबत आहे.
ही हेलिकॉप्टर्स कराराच्या तिसऱ्या वर्षापासून मिळण्यास सुरुवात होतील आणि पुढील पाच वर्षांत त्याचा पुरवठा पूर्ण होईल. एलसीएच हे भारतातील पहिले स्वदेशी डिझाइन केलेले आणि विकसित केलेले लढाऊ हेलिकॉप्टर आहे, जे ५,००० मीटरपेक्षा जास्त उंचीवर कार्य करण्यास सक्षम आहे. या हेलिकॉप्टरचे बहुतांश भाग भारतात डिझाइन आणि उत्पादित केले गेले आहेत आणि या खरेदी प्रक्रियेद्वारे हेलिकॉप्टर एकूण 65 टक्क्यांहून अधिक स्वदेशी बनावटीचे बनविण्याचे नियोजन आहे.
यामध्ये २५० हून अधिक देशांतर्गत कंपन्या सहभागी होतील, ज्यापैकी बहुतांश एमएसएमई असतील आणि यातून ८,५०० हून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांची निर्मिती होईल. दरम्यान, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलाच्या वैमानिकांना हवेतून हवेत इंधन भरण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी मंत्रालयाने फ्लाइट रिफ्युएलिंग एअरक्राफ्ट (FRA) च्या वेट लीजसाठी मेट्रिया मॅनेजमेंटसोबत करार केला.
मेट्रिया सहा महिन्यांत FRA (KC135 विमान) देईल, जे भारतीय हवाई दलाने भाडेतत्त्वावर घेतलेले पहिले FRA असेल. या तीन करारांवर स्वाक्षऱ्या झाल्यामुळे, २०२४-२५ मध्ये संरक्षण मंत्रालयाने स्वाक्षरी केलेल्या एकूण करारांची संख्या १९३ वर पोहोचली आहे. ज्यांचे एकूण करार मूल्य २,०९,०५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आणि मागील सर्वोच्च आकड्याच्या जवळजवळ दुप्पट आहे. यापैकी ९२ टक्के कंत्राटे देशांतर्गत उद्योगांना देण्यात आली होती, ज्यांचे कंत्राट मूल्य १,६८,९२२ कोटी रुपये (८१ टक्के) होते.
गुरुवारी, संरक्षण मंत्रालयाने नाग मिसाइल सिस्टम (NAMIS) च्या ट्रॅक्ड आवृत्तीच्या खरेदीसाठी सार्वजनिक क्षेत्रातील आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेडसोबत करार केला. अँटी-टँक वेपन प्लॅटफॉर्म आणि फोर्स मोटर्स लिमिटेड आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडसोबत सशस्त्र दलांसाठी सुमारे ५,००० हलक्या वाहनांसाठी आणखी एक करार केला, ज्याची एकूण किंमत सुमारे २,५०० कोटी रुपये आहे.