Indian Army
नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेने (DAC) मंगळवारी भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे ६७,००० कोटी रुपयांच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावांना प्राथमिक मंजुरी दिली. यामध्ये ८७ नवीन शक्तिशाली सशस्त्र ड्रोन्स आणि ११० पेक्षा जास्त हवेतून मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांच्या खरेदीचा समावेश आहे.
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानी हवाई तळ आणि रडार साइट्सवर हल्ला करण्यासाठी भारतीय हवाई दलाने ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा अधिक वापर केला होता. या निर्णयामुळे तिन्ही संरक्षण दलांची ताकद अनेक पटींनी वाढणार असून, 'मेक इन इंडिया' उपक्रमालाही मोठे बळ मिळणार आहे.
संरक्षण अधिग्रहण परिषदेने ८७ सशस्त्र 'मीडियम-अल्टिट्यूड लाँग-एन्ड्युरन्स' (MALE) प्रकारच्या ड्रोन्स खरेदीला मंजूरी दिली आहे. या अंतर्गत, भारतीय कंपनी परदेशी कंपनीसोबत मिळून या ड्रोन्सची निर्मिती करणार असून, त्यात तब्बल ६० टक्के स्वदेशी बनावटीचा वाटा असेल. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "ऑपरेशन सिंदूर दरम्यान तिन्ही दलांना अशा सशस्त्र ड्रोन्सची तीव्र गरज भासली होती. हे ड्रोन्स जमिनीवरील लक्ष्यांवर मारा करण्यासाठी क्षेपणास्त्रे आणि लेझर-गायडेड बॉम्ब वाहून नेण्यास महत्वाचे आहेत, तसेच ते दूर अंतरापर्यंत टेहळणी करू शकतात."
MALE ड्रोनची किंमत किती?
एकूण ड्रोन्स : ८७
खरेदीचा खर्च : सुमारे २०,००० कोटी रुपये
देखभाल खर्च : १० वर्षांसाठी लॉजिस्टिकल आणि इतर मदतीसाठी अतिरिक्त ११,००० कोटी रुपये.
संरक्षण परिषदेने ११० पेक्षा जास्त हवेतून मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या खरेदीलाही मंजुरी दिली आहे. भारत आणि रशियाद्वारे संयुक्तपणे बनवलेल्या या क्षेपणास्त्रांसाठी सुमारे १०,८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे क्षेपणास्त्र भारत-रशिया संयुक्त प्रकल्पात विकसित झाले असून ४५० किमीपर्यंत लक्ष्य भेदू शकतात. हे क्षेपणास्त्र मॅक २.८ वेगाने, म्हणजेच आवाजाच्या वेगाच्या जवळपास तीन पट वेगाने उडतात. याव्यतिरिक्त, जुन्या भारतीय युद्धनौकांसाठी ६५० कोटी रुपये खर्चून आठ ब्रह्मोस फायर कंट्रोल सिस्टीम आणि व्हर्टिकल लॉन्चर्स बसवण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.