India Netherlands Agreements | भारत-नेदरलँडमध्ये 17 द्विपक्षीय करार -
राष्ट्रीय

India Netherlands Agreements | भारत-नेदरलँडमध्ये 17 द्विपक्षीय करार

संरक्षण, दुर्मीळ खनिजे यांसारख्या क्षेत्रांतील सहकार्याला गती

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेदरलँड दौर्‍यादरम्यान भारत आणि नेदरलँड यांच्यातील संबंध धोरणात्मक भागीदारीपर्यंत उंचावले आहेत. या दौर्‍यात पंतप्रधान मोदी आणि त्यांचे डच समकक्ष रॉब जेटन यांनी संरक्षण आणि दुर्मीळ खनिजे यांसारख्या क्षेत्रांतील सहकार्याला गती देण्यासाठी 17 करारांवर स्वाक्षर्‍या केल्या.

पंतप्रधान मोदी आणि जेटन यांच्यातील चर्चेनंतर भारत आणि नेदरलँड यांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सेमीकंडक्टर्स, अंतराळ, एआय आणि क्वांटम कॉम्प्युटिंगसह तंत्रज्ञान क्षेत्रातील संबंधांना चालना देण्यासाठी सामरिक भागीदारी आराखडा जाहीर केला.

या दौर्‍यातील मुख्य करार

1. धोरणात्मक भागीदारी आराखडा 2026-2030. याद्वारे व्यापार, संरक्षण, सेमीकंडक्टर्स, एआय, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि सागरी सुरक्षेवर विशेष लक्ष.

2. चोल कालखंडातील ऐतिहासिक वस्तू भारताला परत केल्या जाणार. यामुळे सांस्कृतिक जतन आणि ऐतिहासिक संशोधनाला बळ मिळण्याची अपेक्षा

3. भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी व्हिसाचे नियम सुलभ होणार. इंटर्नशिप, शिक्षण आणि दीर्घकालीन रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार.

4. गुजरातमधील धोलेरा येथील सेमीकंडक्टर फॅब प्रकल्पासाठी टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि एएसएमएल सहकार्य. भारताच्या सेमीकंडक्टर निर्मितीला पाठबळ मिळणार.

5. दुर्मीळ खनिजांच्या क्षेत्रात सहकार्य. पुरवठा साखळी मजबूत करणे आणि गुंतवणूक आकर्षित करणे हे यामागचे उद्दिष्ट.

6. गुजरातमधील कल्पसर प्रकल्पासाठी डच तंत्रज्ञांचे सहकार्य लाभणार.

7. ग्रीन हायड्रोजन आराखडा. युरोपमध्ये भारताच्या ग्रीन हायड्रोजन निर्यातीची व्याप्ती वाढणार. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होण्याची आणि उच्च-कौशल्याचे रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा.

8. नवीकरणीय ऊर्जेवरील संयुक्त कार्य गट. स्वच्छ ऊर्जेचा विस्तार आणि तंत्रज्ञान देवाणघेवाण यावर लक्ष.

9. नीती आयोगासोबत ऊर्जा सहकार्य. अधिक स्वच्छ आणि वैविध्यपूर्ण ऊर्जा प्रणालींवर संयुक्त प्रकल्प.

10. पश्चिम त्रिपुरामध्ये फुलांसाठी केंद्र. फूलशेती आणि निर्यातीच्या संधींना प्रोत्साहन मिळणार.

11. बंगळूर येथे इंडो-डच डेअरी प्रशिक्षण केंद्र. आधुनिक दुग्ध व्यवसाय पद्धती आणि कौशल्य विकासावर भर.

12. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात सहकार्य. जनावरांचे आरोग्य आणि दुधाची गुणवत्ता सुधारण्याची अपेक्षा.

13. सार्वजनिक आरोग्य संशोधन आणि वैज्ञानिक देवाणघेवाणीवर भर.

14. सीमा शुल्क परस्पर प्रशासकीय सहाय्य करारातून द्विपक्षीय व्यापार अधिक सुलभ आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा.

शिक्षणविषयक करार...

15. उच्चशिक्षण क्षेत्रात सहकार्य. शैक्षणिक देवाणघेवाण वाढवणार. संशोधन आणि कौशल्य विकास सुधारण्याची अपेक्षा.

16. नालंदा विद्यापीठ आणि ग्रोनिंगन विद्यापीठ यांच्यात सहकार्य. विद्यार्थ्यांची देवाणघेवाण आणि संयुक्त संशोधनावर भर.

17. लायडेन युनिव्हर्सिटी लायब्ररीज आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांच्यात सहकार्य. चोल इतिहासाचे संशोधन आणि सांस्कृतिक जतनावर लक्ष केंद्रित.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT