नवी दिल्ली; वृत्तसंस्था : दुर्मीळ खनिजांबाबत जगभरात असलेल्या चीनच्या मक्तेदारीला दणका देण्यासाठी भारत आणि जगातील जवळपास 30 देश लवकरच एक नवीन पुरवठा साखळी तयार करत आहेत. सध्या भारत पडद्यामागून या देशांसोबत चर्चा साधत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.
राजधानी दिल्लीत नुकतीच क्वाड देशांची बैठक पार पडली. त्यात भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिकेचे नेते सहभागी झाले होते. या देशांनी मिळून जवळपास 20 अब्ज डॉलर्सचा निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याचा वापर सरकारी आणि खासगी क्षेत्रासोबत दुर्मीळ खनिजांच्या पुरवठा साखळीला सुरक्षित बनवण्याचे काम हाती घेणार आहे. इलेक्ट्रिक वाहने, स्मार्टफोन आणि संरक्षण उपकरणांमध्ये वापरल्या जाणार्या या खनिजांसाठी एक पर्यायी पुरवठा साखळी तयार करण्याच्या योजनेवर भारत आणि इतर 30 देश काम करत आहेत. सध्याच्या परिस्थितीत चीनने दुर्मीळ खनिजांच्या निर्यातीचे नियम अधिक कडक केले आहेत. त्यामुळे चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी या नवीन पुरवठा साखळीचे नियोजन केले जात आहे.
आयातीसाठी चीनवरील अवलंबित्व कमी करण्याकरिता पर्यायी बाजारपेठ आणि पुरवठा साखळी विकसित करण्यासाठी भारत इतर 30-40 देशांसोबत काम करत आहे. भारत कॅनडा, जपान, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांशी चर्चा करत आहे. मात्र, या योजनेला किती देशांनी सहमती दर्शवली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.