India Alliance file Photo 
राष्ट्रीय

India Alliance Protest इंडिया आघाडीच्या मोर्चाला व्यापाऱ्यांचा विरोध, १० हजार कोटींच्या नुकसानीची भीती

मोर्चा दिवाळीनंतर घ्या किंवा इतरत्र घ्या, सोनिया गांधींकडे पत्राद्वारे मागणी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या प्रस्तावित मोर्चा आणि सभेला व्यापारी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. दिवाळीच्या तोंडावर मोर्चा आणि सभेमुळे मध्य दिल्लीतील वाहतूक विस्कळीत होऊन बाजारपेठांमधील व्यापार ठप्प होण्याची आणि हजारो कोटी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सभा दिवाळीनंतर आयोजित करावी किंवा तिचे ठिकाण बदलून बुराडी मैदानावर घ्यावे, अशी मागणी चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (सीटीआय) या संघटनेने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

यापूर्वी संघटनेने राहुल गांधी यांनाही पत्र लिहून रॅली पुढे ढकलण्याची विनंती केली होती. मात्र, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता सोनिया गांधी यांच्याकडून हस्तक्षेपाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

रामलीला मैदानाच्या पाच किलोमीटरच्या परिसरात सदर बाजार, खारी बावली आणि चांदणी चौक यांसह सुमारे २० प्रमुख घाऊक व किरकोळ बाजारपेठा आहेत. या बाजारांमध्ये दररोज १० ते १२ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते, असा सीटीआयचा दावा आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मालाची वाहतूक आणि ग्राहकांची वर्दळ वाढली असताना मोर्चामुळे मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

१० ऑक्टोबर रोजी जंतरमंतर येथे पाच ते सात हजार लोकांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामुळे मध्य दिल्लीतील वाहतूक आठ तास विस्कळीत झाली होती. आता सभेसाठी दहा लाख लोक येण्याची शक्यता असल्याने परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी चिंता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही सभा १०-११ नोव्हेंबरनंतर घ्यावी किंवा बुराडी मैदानावर स्थलांतरित करावी, असे दोन पर्याय देखील संघटनेने सुचवले आहेत. बुराडी येथे १५ हजार वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असल्याचेही पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, सदर बाजार ट्रेड असोसिएशन फेडरेशन आणि किराणा कमिटी दिल्ली यांनी अखिलेश यादव व ममता बॅनर्जी यांनाही पत्र लिहिले आहे. धनत्रयोदशी ते दिवाळीदरम्यान दिल्लीत सुमारे २५ हजार कोटींचा व्यापार होतो. प्रस्तावित सभेमुळे दहा हजार कोटी रुपयांपर्यंत अतिरिक्त नुकसान होण्याची भीती व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे. याचा फटका व्यापाऱ्यांसह कामगार आणि डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनाही बसू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT