चंदीगड ः भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर हरियाणा आणि पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब सीमेवरील पाच जिल्ह्यांतील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणावरून चंदीगड-अमृतसर विमानतळ बंद केले आहे. तर रेल्वेंची तपासणी केली जात आहे. अमृतसरमधील श्री गुरू रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. खबरदारी म्हणून, अमृतसर विमानतळ अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
पोलिसांनी सांगितले की, अमृतसरला जाणारी सर्व विमाने (22 उड्डाणे) रद्द केली आहेत. पुढील आदेश येईपर्यंत विमानतळ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रवाशांना संदेशांद्वारे उड्डाणे रद्द करण्याची माहिती दिली आहे. दोहाहून अमृतसरला येणारे कतार एअरवेजचे विमान क्रमांक क्यूटीआर 54 बी हे पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून ओमानमधील मस्कत विमानतळाकडे वळवले. हे विमान बुधवारी दुपारी 2.10 वाजण्याच्या सुमारास अमृतसरमध्ये उतरणार होते. शारजाह ते अमृतसरला जाणारी स्पाईसजेटची फ्लाईटही रद्द करण्यात आली आहे. पुणे, मुंबई आणि दिल्लीहून अमृतसरला येणारी सर्व विमाने रद्द केली आहेत.
इंडिगोसह अन्य सर्व विमान कंपन्यांनी एक सूचना जारी केली आहे. यामध्ये सर्व प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी विमानाच्या स्थितीची स्पष्ट करण्यासाठी एअरलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
अमृतसर ते पाकिस्तान सीमेचे अंतर अंदाजे 32 किमी इतके आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुरीदके येथे हवाई हल्ला केला आहे, जो अमृतसरपासून केवळ 60 किमी अंतरावर आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.