India Rafale deal File Photo
राष्ट्रीय

India Rafale deal: भारताकडून ११४ राफेल लढाऊ विमानांच्या कराराला वेग; लवकरच फ्रान्सला अधिकृत विनंतीपत्र पाठवणार

भारतीय हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी भारताने फ्रान्सकडून 114 अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेला निर्णायक गती दिली आहे.

मोहन कारंडे

India Rafale deal

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी भारताने फ्रान्सकडून 114 अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी प्रक्रियेला निर्णायक गती दिली आहे. या संरक्षण करारासाठी भारताने विनंती पत्र अंतिम केले असून, येत्या काही आठवड्यांत ते फ्रान्सकडे पाठवले जाणार आहे. तब्बल 3.25 लाख कोटी रुपयांच्या या कराराकडे भारताच्या संरक्षण क्षमतेसाठी मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

“विनंती पत्र तयार आहे आणि ते काही आठवड्यांत फ्रान्सला पाठवले जाण्याची शक्यता आहे,” असे संरक्षण सूत्रांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'ला सांगितले. विनंती पत्र (LoR) म्हणजे सरकार-ते-सरकार पातळीवरील अधिकृत दस्तऐवज असून, मोठ्या संरक्षण व्यवहारांची औपचारिक प्रक्रिया सुरू करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. भारत आणि फ्रान्सदरम्यान होणाऱ्या या करारामुळे भारतीय हवाई दलाला 4.5 पिढीतील बहुउद्देशीय राफेल लढाऊ विमाने मिळणार आहेत.

‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत या 114 विमानांपैकी सुमारे 90 विमाने भारतातच तयार केली जाणार आहेत. यासाठी फ्रान्सची डसॉल्ट एव्हिएशन आणि भारतीय भागीदार कंपनी यांच्यात सहकार्य होणार आहे. उर्वरित 24 विमाने थेट फ्रान्समधून तयार स्वरूपात भारतात आणली जातील. या विमानांमध्ये जवळपास 50 टक्के स्वदेशी घटकांचा समावेश असेल.

दरम्यान, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह जूनच्या सुरुवातीला फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 ते 17 जूनदरम्यानच्या G7 परिषदेसाठीच्या फ्रान्स दौऱ्यापूर्वी हा दौरा होत असल्याने या कराराला अंतिम गती मिळेल. किंमत निश्चिती आणि सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची (CCS) मंजुरी मिळाल्यानंतर यंदाच्या अखेरीस अंतिम करारावर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे.

याआधी भारताने 2016 मध्ये फ्रान्ससोबत झालेल्या आंतर-सरकारी कराराअंतर्गत 36 राफेल विमाने खरेदी केली होती. त्याशिवाय भारतीय नौदलासाठी 26 राफेल मरीन विमानांची स्वतंत्र खरेदी प्रक्रिया सुरू असून, त्याचा करार गेल्या वर्षी 28 एप्रिलला करण्यात आला होता.

भारताच्या मल्टी-रोल फायटर एअरक्राफ्ट कार्यक्रमांतर्गत 114 लढाऊ विमानांची खरेदी केली जाणार आहे. हवाई दलातील लढाऊ विमानांच्या स्क्वॉड्रनची संख्या सध्या केवळ 29 वर आली आहे, तर पाकिस्तान आणि चीनकडून निर्माण होणाऱ्या दुहेरी सुरक्षाधोक्याचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी किमान 42.5 स्क्वॉड्रनची आवश्यकता असल्याचे मानले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT