India vs Bangladesh women's cricket series
नवी दिल्ली: भारतीय महिला क्रिकेट संघाची पुढील महिन्यात होणारी बांगलादेशविरुद्धची घरच्या मैदानावरील मालिका भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुढे ढकलली आहे, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. बोर्ड आता त्याच काळात पर्यायी मालिका आयोजित करण्याचा प्रयत्न करुन असेही स्पष्ट केले आहे.
भारत आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघात तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने असलेली मालिका होणार होती. कोलकाता आणि कटकमध्ये खेळवण्याची शक्यता होती. मात्र आता ही मालिका पुढे ढकलली आहे. आम्ही डिसेंबरमध्ये पर्यायी मालिका आयोजित करण्याचा प्रयत्न करू परंतु तपशीलांवर अद्याप काम सुरू आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेबद्दल, आम्हाला त्यासाठी परवानगी मिळाली नाही," असे बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले. "आम्हाला बीसीसीआयकडून मालिका रद्द करण्याबाबत पत्र मिळाले आहे आणि आता आम्ही नवीन तारखा किंवा तपशील ऐकण्याची वाट पाहत आहोत," बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.
मालिका कोणत्या कारणास्तव पुढे ढकलण्यात आली यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी भारत आणि बांगलादेशमधील राजकीय तणाव कायम आहे. बांगलादेशमधील न्यायालयाने सोमवारी (दि. १७) देशाच्या पदच्युत माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. शेख हसीना यांचे सध्य भारतात वास्तव्य आहे. यामुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये तणाव कायम आहे. ढाका येथील अंतरिम सरकारने भारतात निर्वासित असलेल्या हसीनाला सोपविण्याची विनंती केली आहे. दरम्यान, यावर्षी बीसीसीआयने बांगलादेश पुरुष क्रिकेट संघाबरोबरील वनडे मालिका सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलली होती.