'नीट' गोंधळावरुन लोकसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी Pudhari
राष्ट्रीय

'नीट' गोंधळावरुन लोकसभेत सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

सोनाली जाधव

नवी दिल्ली : लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान 'नीट' (NEET) च्या गोंधळावरुन सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी परीक्षा पद्धतीत अनियमितता असल्याचा आरोप करत शिक्षणमंत्र्यांवर प्रश्न उपस्थित केले. प्रत्युत्तर देताना शिक्षणमंत्र्यांनी नीट परिक्षेत पेपर फुटल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा दावा केला. या मुद्द्यावर सरकारच्या उत्तराने असमाधानी झालेल्या विरोधकांनी सभागृहत्याग केला.

सुधारणा करण्यासाठी सरकार काय करत आहे?

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत ‘नीट’ चा मुद्दा गाजला. आजच्या प्रश्नोत्तराच्या यादीत नीटशी संबंधित प्रश्न दुसऱ्या क्रमांकावर होता. काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी नीट परीक्षा पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आणि त्यातील गोंधळावरुन सरकारवर हल्ला चढवला. त्यांनी पुरवणी प्रश्नावेळी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. याच विषयावर समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार अखिलेश यादव यांनी एका पुरवणी प्रश्नात विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळालेल्या केंद्रांची यादी सरकार जाहीर करणार का, असा सवाल केला. जोपर्यंत हे मंत्री राहतील तोपर्यंत मुलांना न्याय मिळणार नाही, असेही ते म्हणाले.

यावर शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी सार्वजनिक संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यानंतर राहुल गांधी यांनी पुरवणी प्रश्न विचारले. त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आव्हान दिले की, काय चालले आहे ते मला माहीत नाही. देशाने हे समजून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ही फक्त नीट परीक्षा नसून सर्वच परीक्षांमध्ये गोंधळ आहे. सध्या काय चालले आहे या चिंतेने संपूर्ण देश चिंतेत आहे. देशातील परीक्षा पद्धती निरर्थक बनली आहे. जो श्रीमंत आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, तो भारतीय परीक्षा पद्धती विकत घेऊ शकतो, असा लोकांचा विचार होऊ लागला आहे. त्यात सुधारणा करण्यासाठी सरकार काय करत आहे, असा सवाल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला.

याप्रकरणी सरकारची बाजू मांडताना शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल केला. विरोधकांची राजीनाम्याची मागणी फेटाळून लावत त्यांनी सांगितले की, जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळेच आम्ही येथे आहोत. तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही. आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने पंतप्रधानपदाची जबाबदारी दिली आहे. त्यांच्या निर्णयानुसार मी सभागृहात उत्तर देत आहे. ते म्हणाले की, आरडाओरडा केल्याने सत्य बदलत नाही. राहुल गांधींवर निशाणा साधत ते म्हणाले की, देशातील परिक्षांबद्दल जे काही बोलले जात आहे ते निरर्थक आहे, विरोधी पक्षनेत्याच्या या विधानापेक्षा दुर्दैवी काहीही असू शकत नाही. या वक्तव्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

गेल्या ७ वर्षांत पेपरफुटीचा एकही पुरावा सापडला नाही

धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, कपिल सिब्बल यांनी २०१० साली त्यांच्या सरकारमध्ये शिक्षण सुधारणा विधेयक आणले होते. त्यावर आज राहुल गांधी प्रश्न उपस्थित करत आहेत. गेल्या ७ वर्षांत पेपरफुटीचा एकही पुरावा सापडला नसल्याचा दावा शिक्षणमंत्र्यांनी केला. नीट प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. एनटीएने २४० हून अधिक परीक्षा यशस्वीपणे पार पडल्या आहेत, अशी माहितीही शिक्षणमंत्र्यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT