नवी दिल्ली : ‘अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांच्या तक्रारींचे निराकरण केले पाहिजे. यासाठी त्यांच्या मानधनात वाढ करणे, निवृत्त कामगार आणि मदतनीसांना भत्ता देणे, त्यांच्या कामाच्या परिस्थितीत आणि सामाजिक सुरक्षिततेत प्रगतीशील सुधारणेचा मार्ग तयार करणे या ३ गोष्टी केल्या पाहिजेत,’ अशा आशयाचे पत्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपुर्णा देवी यांनी लिहीले.
आपल्या पत्रात राहुल गांधी म्हणाले की, मी अलिकडेच अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी समितीच्या एका शिष्टमंडळाला भेटलो आणि त्यांना येणाऱ्या आव्हानांवर चर्चा केली. मी सुचवलेली पावले सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या गोष्टींचे पालन करणारे आहेत. तसेच कठोर परिश्रम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांबद्दल देशाची कृतज्ञता देखील दर्शवणारे आहेत. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रमाचा कणा आहेत. कुपोषणाशी लढा देऊन तसेच पूर्व-प्राथमिक शिक्षण देऊन महिला आणि मुलांची अथक सेवा त्या करतात. कोविडच्या संकटादरम्यान त्यांनी वैयक्तिक जोखीम पत्करून ठरल्यापेक्षा जास्त काम केले. देशाच्या विकासासाठी कठोर परिश्रम करूनही दुर्दैवाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना अपुरे वेतन मिळत आहे. त्यातही सामाजिक सुरक्षेचा अभाव आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले की, शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या सर्वात तातडीच्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे ग्रॅच्युइटी न मिळणे, सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना औपचारिक कामगार म्हणून मान्यता देऊन, त्यांना पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा, १९७२ अंतर्गत ग्रॅच्युइटीचा अधिकार देऊन जवळजवळ तीन वर्षे उलटून गेली आहेत. मात्र भारत सरकारने या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही, असेही ते म्हणाले.