नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : येथील विवेक विहार परिसरात बेबी केअर सेंटरला (बालरुग्णालयाला) लागलेल्या भीषण आगीत सात नवजात बालकांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री उशिरा ही आग लागण्याची घटना घडली. आगीत संपूर्ण बेबी केअर सेंटर जळून खाक झाले.
बारा नवजात बालकांना बाहेर काढले गेले, मात्र यापैकीही 7 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पाच बालकांना वाचवण्यात आले. त्यांना अन्य रुग्णालयांत हलवण्यात आले आहे. पोलिस उपायुक्त (शाहदरा) सुरेंद्र चौधरी यांनी ही माहिती दिली.
आगीबाबत कळताच दिल्ली अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविता आले. नवजात बालकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जीटीबी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. बेबी केअर सेंटरच्या मालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. बालकांच्या मृत्यूची घटना हृदयद्रावक असून दिल्लीचे सरकार मृतांच्या कुटुंबीयांसमवेत आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
आई-बाबांचा आक्रोश…
आगीनंतरचे द़ृश्य मोठे विदारक होते. वाचलेल्यांमध्ये आपले बाळ असावे, ही प्रत्येक आई-बाबांची स्वाभाविक प्रार्थना होती. अपेक्षाभंगाचे दु:ख वाट्याला आलेल्या आई-बाबांचा आक्रोश शब्दातीत होता…दैवाला आणि देवालाही दूषणे देत होता…
आई-बाबांना सकाळी कळले! काळजाचे तुकडे आगीने गिळले!!
* आपल्या काळजाचे तुकडे रुग्णालयात सुरक्षित आहेत, या विश्वासाने घरी झोपलेल्या आई-बाबांना, आगीने ते गिळले आहेत, हे सकाळी उठल्यावर कळले. उठले तसे या सगळ्यांनी धाय मोकलून रडतच रुग्णालयाकडे धाव घेतली.
* रुग्णालयात एकच एंट्री आणि एक्झिट होते. एका बाळापोटी दिवसाला 15 हजार रुपये घेतले जात.
* माझ्या बाळाला आईची अंगाई गीते ऐकायची होती. बाळसे धरायचे होते. त्यासाठीच तर अॅडमिट केलेले होते. बाळसे कुठे धरले त्याने, कोळसा होऊन आला तो, असा एका मृत बालकाच्या मातेचा आक्रोश दगडालाही पाझर फोडणारा होता.
* दिल्लीचे आरोग्यमंत्री सौरभ भारद्वाजयांनी आरोग्य सचिवांकडून आगीच्या घटनेबद्दलचा अहवाल मागविला आहे. दोषींवर कडक कारवाई होईल, असेही भोेेरद्वाज यांनी स्पष्ट केले आहे.
दिल्लीतील रुग्णालयांत घडलेल्या आगीच्या घटना
* गतवर्षी 9 जून रोजी दिल्लीतील जनकपुरीतील वैशाली कॉलनीच्या एका बाल रुग्णालयालाही आग लागली होती. 20 बालके रुग्णालयात होती. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले होते.
* दिल्ली सरकारच्या रोहिणीतील बाबासाहेब अंबेडकर रुग्णालयातील 5 व्या मजल्यावरील युरोलॉजी विभागाला 31 डिसेंबर 2023 रोजी आग लागली होती. वेळेत ती नियंत्रणात आणली गेली.
* गतवर्षी 11 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजातील एनाटॉमी विभागाला आग लागली होती. अग्निशामक दलाचे 7 बंब रिकामे झाले तेव्हा ती आटोक्यात आली.
* गतवर्षी 7 ऑगस्ट रोजी दिल्ली एम्स रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाला आग लागली होती. एंडोस्कोपी रूममध्ये आग लागल्यानंतर इमर्जन्सी वार्डातील सर्व रुग्णांना इतरत्र हलविण्यात आले होते.
* दिल्लीतील सैन्य रुग्णालयातही गतवर्षी 9 मे रोजी आग लागली होती. सर्व वैद्यकीय उपकरणे जळून खाक झाली होती.
* 17 डिसेंबर 2022 मधील ग्रेटर कैलाशमधील एका रुग्णालयाला आग लागली होती.
* दिल्ली सरकारच्या एलएनजेपी रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाला 18 ऑक्टोबर 2021 रोजी अचानक आग लागली होती.