पुढारी ऑनलाईन डेस्क : IIT Madras director Gaumutra viral video | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मद्रासचे संचालक व्ही. कामकोटी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी गोमूत्राच्या औषधी गुणधर्मांबद्दल सांगितलं आहे. एकदा खूप ताप आला होता, तेव्हा गोमूत्र प्राशन केल्याने बरा झालो, असा दावा कामकोटी यांनी केला आहे. १५ जानेवारी रोजी मट्टू पोंगल दिवशी आयोजित गो संरक्षण शाळेमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
देशी गायींचे संरक्षण आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व यावर बोलताना व्ही. कामकोटी यांनी गोमूत्राच्या अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि पचनक्रिया सुधारण्याच्या गुणधर्मांबद्दल सांगितले. इरिटेबल बोवेल सिंड्रोम सारख्या मोठ्या आतड्यांशी संबंधित समस्यांसाठी गोमूत्र उपयुक्त असल्याचेही ते म्हणाले.
कामकोटी यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि द्रमुक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. द्रमुकने ते सत्याच्या विरुद्ध आणि लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारचा हेतू देशातील शिक्षण बिघडवण्याचा आहे, असा आरोप द्रमुक नेते टीकेएस एलांगोवन यांनी केला आहे. काँग्रेस नेते कार्ती पी. चिदंबरम यांनी कामकोटी यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून आयआयटी मद्राससारख्या संस्थेच्या संचालकांनी अशा गोष्टीची जाहिरात करणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे.