राष्ट्रीय

आयडीएफसी लिमिटेडचे ‘IDFC First Bank’मध्ये होणार विलीनीकरण

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IDFC First Bank : गेल्या वर्षी एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेडच्या विलीनीकरणानंतर आणखी एका मोठ्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. वास्तविक, आयडीएफसीचे आयडीएफसी फर्स्ट बँकेमध्ये विलीनीकरण होणार आहे आणि त्याला बँकेच्या भागधारकांची मान्यता मिळाली आहे. चेन्नई येथील नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल शाखेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भागधारकांच्या मंजुरीनंतर आता या मोठ्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. बँकेकडून या संदर्भातील माहिती शेअर बाजाराला देण्यात आली आहे.

विलीनीकरणाच्या बाजूने 99.95% मते (IDFC First Bank)

आयडीएफसी फर्स्ट बँकेने शेअर बाजाराला सांगितले की, 'नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने 17 मे रोजी या विलीनीकरणावर विचार करण्यासाठी आमंत्रण जारी केले होते. त्यानंतर आम्ही या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती बोर्डाने NCLT ला दिली. या विलीनीकरणाच्या बाजूने 99.95 मते पडली. आयडीएफसी बँकेच्या भागधारकांव्यतिरिक्त, नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर (NCD) धारकांनी आयडीएफसी लि. च्या बँकेसोबत विलीन करण्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे.'

100 शेअर्स ऐवजी 155 शेअर्स

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने डिसेंबर 2023 मध्ये आयडीएफसी लिमिटेडला आयडीएफसी फर्स्ट बँकेत विलीन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. हे विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर, प्रस्तावानुसार, प्रत्येक IDFC Ltd भागधारकाला त्याच्या 100 समभागांच्या बदल्यात IDFC बँकेचे 155 समभाग मिळतील. सूत्रांच्या माहितीनुसार, भागधारकांच्या मंजुरीनंतर एनसीएलटी लवकरच या विलीनीकरणाला ग्रीन सिग्नल देऊ शकते. (IDFC First Bank)

IDFC 1997 मध्ये सुरू

1997 मध्ये इन्फ्रा लेंडर म्हणून आयडीएफसीची सुरूवात झाली. यानंतर, एप्रिल 2014 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आयडीएफसीला बँकेसाठी परवाना मिळाला. ऑक्टोबर 2015 मध्ये जेव्हा ऑन-टॅप परवाना सुरू झाला, तेव्हा IDFC बँक सुरू झाली. त्यानंतर IDFC ची कर्जे आणि दायित्वे बँकेकडे हस्तांतरित करण्यात आली.

शेअर्सवर परिणाम होण्याची शक्यता

आयडीएफसी फर्स्ट बँक आणि आयडीएफसी लिमिटेडच्या विलीनीकरणाच्या बातम्यांचा परिणाम या बँकिंग स्टॉकवर दिसून येण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि. 20) मुंबईतील मतदान असल्याने शेअर बाजाराला सुट्टी आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.21) शेअर बाजार उघडल्यावर याला गती मिळू शकते. या आठवड्यात शनिवारी शेअर बाजार सुरू होता. ज्यात आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शेअर्स वाढीसह बंद झाले. IDFC फर्स्ट बँकेचा समभाग 0.39 टक्क्यांच्या वाढीसह 77.35 रुपयांवर बंद झाला, तर IDFC लिमिटेडचा समभाग 0.57 टक्क्यांच्या वाढीसह 114.40 रुपयांवर बंद झाला.

SCROLL FOR NEXT