झिकासंदर्भात आयसीएमआरने जारी केली मार्गदर्शक Pudhari File photo
राष्ट्रीय

झिकासंदर्भात तपासण्या वाढवण्यासाठी 'आयसीएमआर'च्या सूचना

झिकासंदर्भात आयसीएमआरने जारी केली मार्गदर्शक

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. इतरही काही राज्यांमध्ये झिका व्हायरसच्या संसर्गाचा धोका वाढत आहे. या पार्श्वभुमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (आयसीएमआर) झिका व्हायरसबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये राज्यांना डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या चाचण्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आला आहे. आयसीएमआरने सर्व राज्यांना झिकासंदर्भात तपासण्या वाढवून या संसर्गाबाबत सतर्क राहण्यास सांगितले आहे.

देशातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. यामुळे झिका विषाणूच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे झिका व्हायरसच्या संसर्गाचा धोका वाढु नये, यासाठी पावले उचलली जात आहेत. झिका डासांच्या चावल्याने देखील पसरतो आणि हा विषाणू वाहून नेणारे डास पावसात प्रजनन करू शकतात. त्यामुळे मान्सूनच्या पार्श्वभुमीवर आयसीएमआरने मार्गदर्शक सूचना जारी केली. यामध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाची लक्षणे असलेल्या रुग्णांची झिका व्हायरसची चाचणीही करण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्या आहेत. झिका विषाणू गर्भवती महिलांसाठी आणि नवजात बालकांसाठी अधिक धोकादायक आहे. गर्भवती महिलांमध्येही झिकाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली जावी, असेही सुचवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात झिकाच्या 8 रुग्णांची नोंद

भारतात 2016 मध्ये गुजरात राज्यात सर्वप्रथम झिका विषाणूच्या संसर्गाची नोंद झाली होती. तेव्हापासून, तामिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान, केरळ, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि कर्नाटक यासह इतर अनेक राज्यात रुग्णांना संसर्ग झाल्याची नोंद आहे. 2024 मध्ये जुन अखेरीसपर्यंत महाराष्ट्रात पुण्यात 6, कोल्हापूरात 1 आणि संगमनेरमध्ये 1 अशा आठ रुग्णांची नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT