नवी दिल्ली : भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) विकसित केलेल्या २५ पिकांच्या १८४ सुधारित जातींचे अनावरण केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले. आयसीएआरद्वारे दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शास्त्रज्ञ, वरिष्ठ अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील तज्ञ यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, भारताने उच्च उत्पादन देणाऱ्या बियाण्यांच्या विकासात अभूतपूर्व यश मिळवले आहे. १९६९ मध्ये राजपत्र अधिसूचना प्रक्रिया सुरू झाल्यापासून तांदूळ, गहू, ज्वारी, मका, डाळी, तेलबिया, तंतू आणि इतर पिकांसह एकूण ७२०५ पीक वाण अधिसूचित करण्यात आले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११-१२ वर्षांत नवीन वाण विकासाचा वेग वाढला आहे. याच काळात ३,२३६ उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांना मान्यता देण्यात आली आहे. आता १८४ अधिसूचित सुधारित वाण सुरू करण्यात आले आहेत, ज्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना उच्च उत्पादन, चांगली गुणवत्ता आणि हवामानपूरक वाण असे फायदे मिळतात.
शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, उच्च उत्पादन देणाऱ्या आणि हवामानपुरक बियाण्यांच्यामुळे भारताने कृषी क्रांतीच्या एका नवीन युगात प्रवेश केला आहे. ही कामगिरी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखिल भारतीय समन्वित पीक प्रकल्प, राज्य आणि केंद्रीय कृषी विद्यापीठे आणि खाजगी बियाणे कंपन्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे परिणाम आहे. नव्याने प्रसिद्ध झालेल्या अनेक वाणांमध्ये दुष्काळ, पूर, क्षार, रोग आणि कीटकांना प्रतिकार करू शकतील असे विशेष गुणधर्म आहेत, जे हवामान अनिश्चिततेमध्ये स्थिर उत्पादन सुनिश्चित करतील. उच्च उत्पादनाव्यतिरिक्त, या वाणांमध्ये सुधारित गुणवत्ता, पौष्टिक समृद्धता आणि प्रक्रिया योग्यता असे गुण देखील आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगले बाजारभाव आणि ग्राहकांना दर्जेदार अन्न मिळेल. उच्च दर्जाचे बियाणे प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचावेत याची खात्री करण्याचा आमचा संकल्प आहे, जेणेकरून भारत केवळ स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अन्न उत्पादक बनेल, असेही ते म्हणाले.
भारतीय शेतीला "विकसित भारत" बांधण्याचा पाया म्हणून वर्णन करताना केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले की, देशाने तांदळाच्या उत्पादनात चीनला मागे टाकले आहे, १५०.१८ दशलक्ष टन उत्पादनासह एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारताने आता अन्न सुरक्षा सुनिश्चित केली आहे आणि जागतिक अन्न पुरवठादार बनला आहे. या कामगिरीबद्दल त्यांनी शेतकरी, शास्त्रज्ञ, संशोधन संस्था आणि खाजगी क्षेत्राचे अभिनंदन केले.